नारायण राणेंना धडा शिकवण्यासाठीच तुम्ही हे सर्व केलं का?; संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मंगळवारी अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा जामिनावर मुक्तता झाल्यावर मुंबईत परतलेल्या राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘मी कोणालाही घाबरत नाही. सर्वाना पुरून उरलो आहे. माझ्या घरावर चालून आलात, पण तुम्हालाही घरे व मुले आहेत हे लक्षात ठेवा, असा आव्हानात्मक इशारा शिवसेनेला देतानाच केंद्रीय सूक्ष्म लघू-उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मी आता जपून शब्द वापरणार आणि शिवसेनेच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या सर्व प्रकरणावर आता भाष्य केलं आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अटक आणि नंतर जामीनामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यांवर चर्चा केली आहे.

“शिवसेना सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील. जर तुम्ही मर्यादा ओलांडली तर आम्हीही तेच करू,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नारायण राणेंना धडा शिकवण्यासाठीच तुम्ही हे सर्व केलं का? असा सवाल केला असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

“हे राजकारण कसे असू शकते? महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तीन पक्षांचे सरकार दोन वर्षांपासून चांगले काम करत आहे. या दोन वर्षांत कित्येक वेळा सूड घेऊ शकलो असतो. नारायण राणे हे मोदीजींचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि आम्ही त्यांचा नेहमीच आदर केला आहे. केंद्रात राज्यातील एक मंत्री असल्याने महाराष्ट्र आनंदी होता. पण ते कसे बोलतात हे तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या विरोधात बिनडोकपणे काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी शिवसेना सोडली होती आणि आता ते भाजपमध्ये आहेत. तुम्ही जिथे असाल तिथे आनंदाने जगा,” असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

“तुम्ही कोण आहात? जनता सर्वोच्च आहे. तुम्ही जन आशीर्वाद रॅली काढली आहे. जर तुम्हाला लोकांचे आशीर्वाद मिळत असतील तर आशीर्वाद घ्या आणि पुढे जा. पण तुम्ही शिवसेनेला शिव्या देता. लोकशाही आहे, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोला. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना कानाखाली मारण्याबद्दल बोलता? मोदींच्या कॅबिनेट मंत्र्याची ही भाषा आहे का?,“ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका