नाशिक: अकरावी प्रवेशासाठी रांगा ; कागदपत्रे जमा करताना अडचणी

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होताच विविध शाखांसाठी उपयुक्त गुणांच्या टक्केवारीने पालकांसह विद्यार्थ्यांना अंचबित केले आहे.

नाशिक – अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होताच विविध शाखांसाठी उपयुक्त गुणांच्या टक्केवारीने पालकांसह विद्यार्थ्यांना अंचबित केले आहे. पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी महाविद्यालयांमध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी गर्दी केली.

दहावीचा निकाल दोन जून रोजी लागल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु, राज्यस्तरावरून एकाच वेळी आभासी पध्दतीने ही प्रक्रिया सुरू असल्याने ती रखडली. निकाल जाहीर झाल्यानंतर २० दिवसांनी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ६४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून २४ जूनपर्यंत पहिल्या यादीतील प्रवेश सुरू राहणार आहेत. त्यामुळे पहिल्या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी सकाळपासून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी रांगा लावल्या होत्या.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

दरम्यान, यंदाही विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे अधिक आहे. शहरातील नामांकित के.टी.एच.एम., हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालय, पंचवटी महाविद्यालय, भि.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयाला विद्यार्थ्यांची अधिक पसंती आहे. पहिल्या यादीत आपल्या आवडीचे महाविद्यालय न मिळाल्याने नारा विद्यार्थी आता दुसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत आहेत. पहिल्या यादीत प्रवेश घेतांना काही विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करतांना अडचणी आल्या. कागदपत्रांची जुळवाजुळव करतांना पालकांना संबंधित कार्यालय, महाविद्यालय अशा फेऱ्या माराव्या लागल्या. इतक्या अडचणींमध्ये अडकण्यापेक्षा काही विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणी वर्गाशी करार केलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला.

हे वाचले का?  उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, दिवाळी खरेदीच्या गर्दीने वाहतूक विस्कळीत