नाशिक : अवकाळी, गारपिटीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसान, द्राक्ष, कांदा, भात भुईसपाट

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने ३२ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नाशिक – जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने ३२ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक ११५९७ हेक्टर द्राक्षबागांचा समावेश असून त्या खालोखाल साडेदहा हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ८९० गावांतील ६७ हजार ८६६ शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला.

रविवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत अनेक भागांना गारपीट आणि अवकाळीने झोडपले. एका झटक्यात होत्याचे नव्हते झाले. सोमवारी काही भागांत अवकाळीने हजेरी कायम ठेवल्याने नुकसानीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालावरून रविवारच्या गारपीट व अवकाळी पावसात ३२ हजार ८३२ हेक्टरवरील जिरायत, बागायत क्षेत्रासह बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले. इगतपुरी (१२२), कळवण (११८), निफाड (१०२), दिंडोरी (९८), नाशिक (८९), नांदगाव (८८), सटाणा (७६), सुरगाणा (७१), पेठ (६४), चांदवड (३०), त्र्यंबकेश्वर (२०). सिन्नर (नऊ), येवला (पाच) अशा १३ तालुक्यांतील एकूण ८९० गावांत पिकांचे नुकसान झाले. मालेगाव, देवळा तालुक्यातील पिके काहीअंशी बचावली. या तालुक्यातील एकाही गावाचा प्राथमिक अहवालात समावेश नाही.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

गारपीट, अवकाळीने ११ हजार ५९७ हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. नवीन लाल कांदा काढणीवर आला होता. पावसात १० हजार ४०८ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. ४६७ हेक्टरवरील कांदा रोपे पाण्यात गेल्याने उन्हाळ कांद्याची लागवड अडचणीत येणार आहे. भात (६७२९ हेक्टर), गहू (५७८), टोमॅटो (३१०), भाजीपाला व इतर (१७९५), मका (१६९), ऊस (२२१ हेक्टर) नुकसान झाले. सुमारे ३४ हेक्टरवरील डाळिंबा बागांनाही फटका बसल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिरायत क्षेत्रातील ४८८ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले. जिरायत व बागायत क्षेत्राचा विचार केल्यास सुमारे २२०० हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

निफाडला सर्वाधिक झळ

नैसर्गिक संकटाचा सर्वाधिक फटका निफाड तालुक्याला बसला. या तालुक्यातील ९२९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव व देवळा तालुक्यात नुकसान झाले नाही. परंतु, उर्वरित सर्व तालुक्यांना झळ बसली. सटाणा तालुक्यात (५७० हेक्टर), नांदगाव (३२५३), कळवण (७७३). दिंडोरी (२९६४), सुरगाणा (२२५), नाशिक (८६८), त्र्यंबकेश्वर (२२८), पेठ (५५६), इगतपुरी (५९२०), सिन्नर (३७), चांदवड ७५७७) आणि येवला तालुक्यात (५६५) हेक्टरचे नुकसान झाले.

जिल्ह्यात ६८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

रविवारच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सुमारे ६८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात चांदवड तालुक्यातील १९४७०, निफाड १३८३२, इगतपुरी १११२१, पेठ ४८९०, दिंडोरी ३४४०, कळवण ३९०५, सटाणा ६९७, नाशिक १८९६, त्र्यंबकेश्वर ५५१, येवला ९०४, सुरगाणा ७४० इतक्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.