नाशिक : आनंदवलीतील दर्ग्याची पाहणी करण्याचा मनपा आयुक्तांचा निर्णय

आनंदवलीतील दर्ग्यासह अन्य धार्मिक स्थळांची पाहणी करून त्या ठिकाणी जर अतिक्रमण झाले असेल तर काढण्यात येईल, अशी माहिती आयुक्तींनी दिली.

नाशिक – आनंदवलीतील दर्ग्यासह अन्य धार्मिक स्थळांची पाहणी करून त्या ठिकाणी जर अतिक्रमण झाले असेल तर काढण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. 

बुधवारी येथे सकल हिंदू समाजातर्फे हिंदू हुंकार सभा झाली. सभेत सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी आनंदवली दर्ग्याचा मुद्दा मांडला होता. याविषयी आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना पत्रकारांनी विचारले असता दर्ग्यासह शहर परिसरातील अन्य धार्मिक स्थळांची पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्यावर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले. दरम्यान, गुरुवारी चव्हाणके यांनी आनंदवलीतील दर्ग्यास भेट दिली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रियाज शेख यांनी सभेतील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगितले. तसेच चव्हाणके यांच्या पाहणीनंतरही या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत