नाशिक : काँक्रिटीकरणामुळे रामकुंडातील अस्थिंचे अविघटन, देवांग जानी यांचा दावा

रामकुंडात अस्थिविसर्जनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरीक येत असतात. मागील कुंभमेळ्यात गोदाकाठाचे मूळ रूप बदलत सिमेंटचे कठडे तयार करण्यात आले.

रामकुंड परिसरात झालेल्या काँक्रिटीकरणामुळे अस्थिविसर्जन, विघटनास अडथळा निर्माण होत आहे. यातील झरे मोकळे करण्यासाठी रामकुंडासह गोदाकाठातील काँक्रिटीकरण काढण्यात यावे, अशी मागणी गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केली आहे. मंगळवारी स्मार्टसिटीच्या वतीने गोदापात्रात सुरू असलेल्या कामावर त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून स्थगिती आणली.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

येथील रामकुंडात अस्थिविसर्जनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरीक येत असतात. मागील कुंभमेळ्यात गोदाकाठाचे मूळ रूप बदलत सिमेंटचे कठडे तयार करण्यात आले. रामकुंडही यातून सुटले नाही. याचा विपरीत परिणाम अस्थिविसर्जनावर झाला असल्याकडे जानी यांनी लक्ष वेधले. काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक झरे आटले आहेत. रामकुंडात अस्थिंचे विघटन नैसर्गिक पद्धतीने होत असते. परंतु, कुंडात सिमेंटचे काम करण्यात आल्याने ही नैसर्गिक प्रक्रिया थांबली आहे. यामुळे कुंडात अस्थि विघटन न होता पडून आहेत.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून अस्थिंचे ढिग कचरा म्हणून उपसले जात आहे. लोकांच्या श्रद्धेशी हा खेळ होत असल्याचा आरोप जानी यांनी केला आहे. रामकुंडासह गोदाकाठावरील काँक्रिटीकरण काढण्यात यावे, नैसर्गिक झरे मुक्त करावे, अशी मागणी जानी यांनी केली आहे. स्मार्टसिटीकडून गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या कामांना न्यायालयातून स्थगिती आणली असल्याचेही त्यांनी सांगितले. या कामाला पुरोहित संघानेही विरोध केलेला आहे.