नाशिक : छकुल्यानंतर घोड्या स्थानबद्ध; सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची कारवाई

सराईत गुन्हेगार गणेश उर्फ छकुल्या वाघमारेला वर्षभरासाठी स्थानबद्ध केल्यानंतर आता नाशिकरोड परिसरातील कूप्रसिद्ध घोड्या तोरवणे याच्यावर पुन्हा एकदा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक – सराईत गुन्हेगार गणेश उर्फ छकुल्या वाघमारेला वर्षभरासाठी स्थानबद्ध केल्यानंतर आता नाशिकरोड परिसरातील कूप्रसिद्ध घोड्या तोरवणे याच्यावर पुन्हा एकदा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. आता पुढील कारवाई कुणावर होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

सचिन उर्फ घोड्या तोरवणे (२७, सिध्देश्वरनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याची नारायण बापूनगर, लोखंडे मळा, दसक, जुना सायखेडा रोड, जेलरोड आणि नाशिकरोड परिसरात दहशत आहे. धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार, जबर दुखापत, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, दहशत निर्माण करणे असे विविध गुन्हे त्याच्या नावावर आहेत. २०१९ मध्ये शहर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली होती. मात्र कारागृहातून बाहेर पडताच त्याने पुन्हा आपले वर्चस्व कायम राहण्यासाठी गुन्ह्यांची मालिका सुरू केली.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

शहरातील उपनगरसह धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा एकदा स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात त्याला दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिसांची या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी सराईत गणेश उर्फ छकुल्या वाघमारे याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.

शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार आहे. शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या आणि समाज स्वास्थ बिघडविणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार यापुढेही प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा