महाविकास आघाडीचे दिंडोरी मतदार संघातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री वणी येथे पवार यांची जाहीर सभा झाली.
देशातील विविध जाती-धर्मांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी आपली शक्ती वापरण्याऐवजी पंतप्रधान संबंधितांमध्ये अंतर कसे वाढेल, याचा विचार करतात. हा देशाच्या ऐक्यावर अन्याय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले. महाविकास आघाडीचे दिंडोरी मतदार संघातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री वणी येथे पवार यांची जाहीर सभा झाली. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली होती. त्यांच्या भाषणांचा संदर्भ देत पवारांनी मोदींना लक्ष्य केले.
देशाच्या प्रमुखाची पहिली जबाबदारी सर्व घटकांना जात, धर्म, भाषा यावर भेदभाव न करता एकसंघ ठेवण्याची असते. परंतु, हे पहिले पंतप्रधान आहेत की, जे आपली शक्ती विविध जाती-धर्माच्या लोकांमध्ये अंतर पाडण्यासाठी वापरत आहेत, अशी टीका त्यांनी केली. नार-पारसह पश्चिमी वाहिनी नद्याचे गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी वळविण्याची योजना तातडीने करण्याची आवश्यकता आहे. परंतु, गुजरातला पाणी जात असेल तर, महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी बघ्याची भूमिका घेण्याचे कारण नाही. कदाचित देशाचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यामार्फत काही सूचना असतील तर, एका दृष्टीने नाशिक व महाराष्ट्रावर तो अन्याय असल्याचे पवार यांनी सूचित केले.