नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव

शासकीय यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नामांकन देत सर्वोत्कृष्ठ उपक्रमांना स्कॉच ग्रुप या संस्थेच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात येते.

नाशिक: शासकीय यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नामांकन देत सर्वोत्कृष्ठ उपक्रमांना स्कॉच ग्रुप या संस्थेच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा हा पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रभावी उपयोग करून पाणी टंचाई असणाऱ्या गावांमध्ये जमिनीतील पाणी पातळी वाढावी यासाठी मिशन भगिरथ प्रयास राबविण्यात आले. त्यानुसार बंधारे निर्मिती करण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी स्कॉच रेटिंग ग्रुप या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेला राष्ट्रीय स्कॉच पुरस्कार जाहीर झाला. दिल्ली येथे स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय स्कॉच पुरस्काराचे ऑर्डर ऑफ मेरीट प्रमाणपत्र दुरदृश्यप्रणालीद्वारे स्कॉच ग्रुपचे रोहन कोचर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वीकारले होते. देशभरातून ३०० विविध प्रकल्पांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ज्यामधील ७५ प्रकल्प ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कारासाठी पात्र झाले होते. विविध विषयातील तज्ज्ञांनी दिलेले गुण तसेच नागरिकांनी आभासी पद्धतीने केलेले मतदान यातून नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेला मिशन भगिरथ प्रयास उपक्रम हा उत्कृष्ठ ठरला. मिशन भगिरथ प्रयास अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २६१ साखळी बंधारे बांधण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे. पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत साखळी बंधाऱ्यांबरोबरच वृक्षारोपण, जल पुनर्भरण, शोषखड्डे इत्यादी विविध पूरक उपक्रम केल्यामुळे जलस्त्रोत बळकटीकरणास मदत झाली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांसाठी राबवण्यात आलेल्या मिशन भगिरथ प्रयास उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने देखील ही अभिमानाची बाब आहे.