नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार, गंगापूर, कडवा, नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग; गोदावरी पात्रात बस अडकली, भाविक सुरक्षितपणे बाहेर

२४ तासांतील पावसाने नदी-नाले किमान दुथडी भरून वाहण्याच्या मार्गावर आहेत. अकस्मात पाण्याची पातळी वाढल्याने भाविकांची काही वाहने गोदावरी पात्रालगतच्या वाहनतळात अडकून पडली.

नाशिक : जिल्ह्यातील काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेने गंगापूर, कडवा व नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी दुपारी विसर्ग करण्यात आला आहे. या हंगामात गोदावरीसह अनेक लहान-मोठ्या नद्या आजवर दुथडी भरूनही वाहिल्या नव्हत्या. २४ तासांतील पावसाने नदी-नाले किमान दुथडी भरून वाहण्याच्या मार्गावर आहेत. अकस्मात पाण्याची पातळी वाढल्याने भाविकांची काही वाहने गोदावरी पात्रालगतच्या वाहनतळात अडकून पडली. राजस्थानच्या भाविकांच्या बस चालकाला अंदाज न आल्याने काठालगत पाण्यात अडकली. स्थानिक नागरिकांनी बसमधील भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान, आसपासच्या गटारीचे पाणी थेट पात्रात मिसळत असल्याने गोदावरीतून काळसर पाणी प्रवाही होत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वरलगतच्या अंबोली येथे सकाळी सहा वाजेपर्यंत १०२ मिलीमीटर तर इगतपुरीतील भावली धरण परिसरात सर्वाधिक १२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दारणा (३९), मुकणे (२९), वाकी (५५), भाम (३३), गंगापूर धरण समुहातील कश्यपी येथे (५२), गौतमी-गोदावरी (७७), कडवा (४१), वाघाड (२७), ओझरखेड (२८), पुणेगाव (३५), त्र्यंबकेश्वर (३२) मिलीमीटर पाऊस झाला आहे. दारणा धरणातून एक्स्प्रेस कालवा व गोदावरी कालव्यात आधीपासून विसर्ग सुरू होता. त्यामुळे या धरणातील जलसाठा कमी होऊन ८७ टक्क्यांवर आला होता. या पावसाने दारणा पुन्हा तुडुंब होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणही तुडुंब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दुपारी १०४० क्युसेसने विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. कडवा धरणातून दुपारी २१२ क्युसेक तर नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३०० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. कळवण तालुक्यात संततधारेने चणकापूर धरणासह लघू प्रकल्प तुडुंब झाले आहे. चणकापूर, पुनद धरणातील पाणी गिरणा पात्रात येत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे यांच्या फेरीचा शांततेत समारोप

काळसर व दुर्गंधीयुक्त पाणी

संततधारेमुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आसपासच्या गटारीचे पाणी थेट पात्रात मिसळत आहे. गोदावरीच्या काठालगत महानगरपालिकेच्या सांडपाण्याच्या वाहिन्या मार्गस्थ झालेल्या आहेत. तुडुंब झालेल्या या वाहिन्यांतील पाणी पात्रात येत आहे. यामुळे गोदा पात्रातून काळसर, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याचे विदारक चित्र आहे.

बससह काही वाहने अडकली

पंचवटी व रामकुंड परिसरात येणारे भाविक गोदावरीच्या काठालगत मोकळ्या जागेत वाहने उभी करतात. शुक्रवारी या ठिकाणी वाहने उभी करून भाविक दर्शनासाठी गेले. अकस्मात नदीची पातळी वाढल्याने काही भाविकांनी वाहने पाण्यात अडकली. याचवेळी राजस्थान येथील भाविकांची खासगी बस गाडगे महाराज पुलालगतच्या खालील भागातून निघाली होती. चालकाला काठालगतच्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि ही बस देखील अडकली. यातील भाविकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले