नाशिक जिल्ह्यात १३०७ गाव-वाड्यांना टँकरने पाणी

जूनच्या पूर्वार्धात जिल्ह्यातील ३६६ गावे आणि ९४१ वाड्या अशा एकूण १३०७ गाव-वाड्यांना ३९९ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : जूनच्या पूर्वार्धात जिल्ह्यातील ३६६ गावे आणि ९४१ वाड्या अशा एकूण १३०७ गाव-वाड्यांना ३९९ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. मुसळधार स्वरुपात पाऊस न कोसळल्यास पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप घेऊ शकते.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सात लाख २० हजार ३७२ नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी एकतर टँकर वा अधिग्रहित केलेल्या विहिरींवर अवलंबून आहेत. नांदगाव तालुक्यात त्यांची संख्या सर्वाधिक ७७ इतकी आहे. या तालुक्यातील ६६ गावे व ३३८ वाड्यांना टँकरने पाणी पुरवले जाते. टंचाईपासून दूर राहिलेल्या नाशिक तालुक्यात एका गावाला टँकरने पाणी द्यावे लागत आहे.

हे वाचले का?  नाशिक : माजी नगरसेविकेच्या घरी चोरी, एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास

मालेगाव तालुक्यात ४४ गावे व ८८ वाड्या (५६ टँकर), सिन्नर तालुक्यात १६ गावे व २६४ वाड्या (४४ टँकर), बागलाण ३४ गावे व १५ वा्या (४२ टँकर), येवला तालुक्यात ६१ गावे व ६० वाड्या (६०), सुरगाणा ३१ गावे व ११ वाड्या (४२), चांदवड २९ गावे व ९७ वाड्या (३३ टँकर), पेठ १८ गावे व १३ वाड्या (१६ टँकर), त्र्यंबकेश्वर चार गावे (चार टँकर) अशी स्थिती आहे. कळवण तालुक्यातील १९ गावे व दोन वाड्या तर दिंडोरीतील पाच गावे पाणी टंचाईला तोंड देत आहे. त्यांच्यासाठी अनुक्रमे २२ व पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. निफाड हा असा एकमेव तालुका आहे जिथे संपूर्ण उन्हाळ्यात आजतागायत टँकरची गरज भासलेली नाही. खासगी व शासकीय अशा एकूण ३९९ टँकरद्वारे दैनंदिन ८८९ फेऱ्यांमधून पाणी पुरवठा केला जात आहे.

हे वाचले का?  नाशिक : पालकमंत्री भुसे -भुजबळ प्रथमच समोरासमोर, लाडकी बहीण योजना आढावा बैठकीचे निमित्त

२१४ विहिरी अधिग्रहित

दुष्काळाला तोंड देण्यासाठी प्रशासनाला जिल्ह्यात २१४ विहिरींचे अधिग्रहण करावे लागले. यातील ६५ विहिरी गावांची तहान भागविण्यासाठी तर १४३ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या. बागलाण तालुक्यात सर्वाधिक ५६ विहिरींचे अधिग्रहण झाले. दिंडोरीत पाच, कळवण २२, पेठ १३, सुरगाणा १४, चांदवड पाच, देवळा ३३, मालेगाव ५०, येवला सहा आणि नांदगाव तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद