नाशिक: जिल्ह्यातील धरणसाठा ४१ टक्क्यांवर; २९ गावे, १० वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा

अवकाळीनंतर उन्हाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली असताना एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणसाठा ४१ टक्क्यांवर आला आहे.

नाशिक – अवकाळीनंतर उन्हाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली असताना एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणसाठा ४१ टक्क्यांवर आला आहे. अल निनोच्या प्रभावाने यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन केले जात आहे. वाढत्या उकाड्याबरोबर ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत. सद्यस्थितीत २९ गाव आणि १० वाड्यांना २१ टँकरद्वारे पिण्याचे पाणी दिले जात आहे. नऊ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात टंचाईच्या गर्तेत सापडणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये सध्या २६ हजार ७४१ दशलक्ष घनफूट अर्थात ४१ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी धरणांमध्ये इतकेच पाणी होते. या वर्षी पाऊस उशिराने दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत धरणातील पाणी पुरेल असे फेरनियोजन केले जात आहे. एरवी धरणांतील पाण्याचे ३१ जुलैपर्यंत पुरेल या हिशेबाने नियोजन केले जाते. माणिकपूंज हे धरण कोरडेठाक झाले असून नागासाक्या, गौतमी गोदावरी, तिसगाव, भोजापूर, वाघाड, पुणेगाव या धरणांतील जलसाठा १० ते २२ टक्क्यांच्या दरम्यान आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या २९९८ दशलक्ष घनफूट (५३ टक्के) जलसाठा आहे. याच समुहातील काश्यपीत ९६१ (५२), गौतमी गोदावरी ३०२ (१६), आळंदी २४९ (३१) पाणी आहे.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

पालखेड २३२ (३६), करंजवण १५२६ (२८), वाघाड ३३२ (१४), ओझरखेड ६५३ (३१), पुणेगाव १३५ (२२), तिसगाव ७९ (१७), दारणा ४६८७ (६६), भावली ५५५ (३९), मुकणे ४०८९ (५६), वालदेवी ५४९ (४८), कडवा ४७९ (२८), नांदूरमध्यमेश्वर २२९ (८९), चणकापूर १२९२ (५३), हरणबारी ६१२ (५२), केळझर २२९ (४०), नागासाक्या ४० (१०), गिरणा ५४०९ (२९), पुनद १०२३ (७८) असा जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर गेल्या काही दिवसात उन्हाचा तडाखा वाढत आहे. तापमान ४० अंशाचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असल्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनातही वाढ होते. एक धरण कोरडे झाले असून कमी जलसाठा असणाऱ्या सहा धरणांची वाटचाल त्या दिशेने होणार आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

येवल्यात टंचाईच्या झळा

ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागत आहे. सध्या पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळ येवला तालुक्यास बसत आहेत. या तालुक्यातील १९ गावे व सात वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात तीन गावे व एका वाडीला तीन टँकरने पाणी पुरविले जात आहे. देवळा व बागलाण तालुक्यातील प्रत्येकी एक गाव, चांदवड तालुक्यात पाच गावे व एक वाडीला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मालेगावमध्ये सहा तर देवळ्यात तीन याप्रमाणे जिल्ह्यात एकूण नऊ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जवळपास ४७ हजार लोकसंख्येच्या गावांना टँकरद्वारे पाणी दिले जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा