नाशिक जिल्ह्यातील बंद कारखान्यांची आता पडताळणी, अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी महामार्गांवर वाहनांची तपासणी

शिंदे गावातील बंद कारखान्यात एमडी पावडर अर्थात अमली पदार्थाची निर्मिती होत असल्याचे उघड झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने आता औद्योगिक वसाहतींसह इतरत्र बंद कारखान्यांच्या तपासणीचा निर्णय घेतला आहे.

नाशिक – शिंदे गावातील बंद कारखान्यात एमडी पावडर अर्थात अमली पदार्थाची निर्मिती होत असल्याचे उघड झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने आता औद्योगिक वसाहतींसह इतरत्र बंद कारखान्यांच्या तपासणीचा निर्णय घेतला आहे. अमली पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शेजारील राज्यांना जोडणाऱ्या महामार्गांवर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांनी शिंदे गावातील एका कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर याच भागातील गोदामातून शहर पोलिसांनी अमली पदार्थाचा साठा जप्त केला. अशीच कारवाई वडाळा गावातही झाली होती. लागोपाठच्या या कारवायांमुळे नाशिक हे चांगलेच चर्चेत आले. शहरासह परिसरात अमली पदार्थ निर्मिती होत असताना त्याविषयी स्थानिक यंत्रणेला खबरही लागली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक अमली पदार्थाचा केंद्रबिंदू ठरल्याचे आरोप-प्रत्यारोप राजकीय पातळीवर होत आहेत. अमली पदार्थ माफिया ललित पाटील याचे संबंध कोणाकोणाशी आले, यावरूनही स्थानिक राजकारण ढवळून निघाले.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

या पार्श्वभूमीवर, जिल्हास्तरीय अमली पदार्थ प्रतिबंधक समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी औद्योगिक वसाहतीतील बंद कारखान्यांच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. या कारखान्यात नेमके काय सुरू आहे, याची छाननी करण्याचे निश्चित झाले. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मदत घेतली जाईल. शेजारील राज्यांना जोडणाऱ्या मार्गावर वाहनांच्या तपासणीसाठी चार ठिकाणे सुचविली गेली आहेत. पोलिसांमार्फत तपासणी नाके स्थापून अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे वाघ यांनी सांगितले. जे युवक अमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत, त्यांची त्यातून सोडवणूक करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुनर्वसन व उपचार केद्र स्थापन करण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

मध्यंतरी शैक्षणिक संस्था आणि मुख्याध्यापकांची बैठक झाली होती. त्यावेळी निश्चित झाल्यानुसार शाळेच्या पालक-शिक्षक समितीची बैठक पोलीस यंत्रणेकडून घेतली जाईल. अमली पदार्थांविषयी जनजागृतीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. समितीवर विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविली जाईल. शाळेच्या आवारात अमली पदार्थाशी संबंधित काही घडत असल्याचे लक्षात आल्यास समितीने अशी माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी, असे सांगण्यात आले आहे.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग