नाशिक जिल्ह्यातील वायनरींमध्ये पर्यटनाचा बहर, वाइनचा खप २० टक्क्यांनी वाढला

नाताळ सुट्टीत जिल्ह्यातील वायनरींमधील पर्यटनात लक्षणीय वाढ झाली असून वाइनचा खपदेखील २० टक्क्यांनी वाढला आहे.

नाशिक – नाताळ सुट्टीत जिल्ह्यातील वायनरींमधील पर्यटनात लक्षणीय वाढ झाली असून वाइनचा खपदेखील २० टक्क्यांनी वाढला आहे. नववर्ष स्वागतासाठी देशभरातून सहकुटुंब दाखल झालेल्या हजारो पर्यटकांनी जिल्ह्यातील वायनरी बहरल्या आहेत. विशेष म्हणजे वाइनची चव चाखण्यात महिला पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे नसल्याचे अधोरेखित होत आहे.

वाइनची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये नववर्षाचे स्वागत वाइनसह करण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली. सुलासारख्या एकेका वायनरींमध्ये दिवसाला अडीच ते तीन हजार पर्यटक हजेरी लावत आहेत. मागील काही वर्षात नागरिकांची जीवनशैली बदलली आहे. वाइन सेवन आरोग्यदायी, प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे तिचा खप वाढत आहे. २०२३ च्या हंगामात देशात सुमारे अडीच कोटी लिटर वाइनची निर्मिती झाली. यातील निम्मी म्हणजे सुमारे सव्वाकोटी लिटर वाइन एकट्या नाशिकमध्ये तयार झाल्याचे भारतीय वाइन उत्पादक संघटनेचे सचिव राजेश जाधव यांनी नमूद केले.

हे वाचले का?  उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, दिवाळी खरेदीच्या गर्दीने वाहतूक विस्कळीत

संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अनेक राज्यांनी वाइनसाठी वेगळे धोरण आणले. त्यामुळे मद्य-वाइनमध्ये फरक होऊन वाइनची सहज उपलब्धता वाढली. अनेकांना ती कशी तयार होते, याची उत्सुकता असते. त्यामुळे देशभरातील पर्यटक वर्षभर नाशिकमध्ये येतात. ओझर आणि शिर्डी विमानतळाहून त्यांना या ठिकाणी लवकर पोहोचण्याची व्यवस्था आहे. मुंबईतून नाशिक फारसे दूर नाही. नाताळ, नववर्ष स्वागत अशा विशिष्ट प्रसंगी पर्यटकांची संख्या कमालीची विस्तारते, असे त्यांनी सांगितले. यंदा आलेल्या पर्यटकांमध्ये मुंबई पुण्यासह अहमदाबाद, सूरत, दिल्ली, गोवा अशा विविध भागांतील तसेच काही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. देशाअंतर्गत वाइनचा खप २० टक्के वाढला असून भारतीय वाइनची आठ ते १० टक्के निर्यात होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. वाइन सेवनात महिलांचे प्रमाण वृद्धिंगत होत असल्याचे वायनरीचे निरीक्षण आहे.

हे वाचले का?  सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

सध्या आमच्या वायनरीला दररोज अडीच ते तीन हजार पर्यटक भेट देत आहेत. त्यात सहकुटुंबियांची संख्या अधिक आहे. वाइनकडे आता ‘कौटुंबिक पेय’ म्हणून पाहिले जाते. सामाजिक पेय म्हणून तिला मान्यता मिळाली. वायनरींमध्ये आलेले निम्मे पर्यटक वाइनची चव घेतात. यामध्ये ४० टक्के महिला आहेत. महिलांकडून वाइनला पसंती मिळण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. मद्य सेवनाने होणारा धांगडधिंगा अनेकांना नको असतो. त्यामुळे ते शांत वायनरींकडे वळतात. वाइन सुसंस्कृत सवयीचा भाग बनली असून तिचा खपही वाढत आहे. – मोनित ढवळे (वरिष्ठ उपाध्यक्ष, सुला वायनरीज)

हे वाचले का?  नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार