जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी अभूतपूर्व उत्साहात मतदान झाले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ९६.९० टक्क्यांवर पोहोचली.
नाशिक – जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी अभूतपूर्व उत्साहात मतदान झाले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ९६.९० टक्क्यांवर पोहोचली. दोन ठिकाणी नावे असल्याने काहींना मतदानापासून वंचित रहावे लागले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. दिग्गज राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यांच्या भवितव्याचा फैसला मतदानातून होणार आहे.
कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्र व मतमोजणीस्थळी पोलीस यंत्रणेने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मतदान केंद्रात कॅमेरा व तत्सम साधने नेण्यास प्रतिबंध होता. त्यामुळे तपासणीअंती मतदारांना केंद्रात प्रवेश मिळाला. नाशिक बाजार समितीसाठी १३ केंद्रांवर मतदान झाले. त्यातील काही ठिकाणी एकाचवेळी वाहनांमधून मोठ्या संख्येने मतदार आल्याचे पहायला मिळाले. काही मतदारांची दोन ठिकाणी नावे आढळली. त्यांना मतदान करता आले नाही. या ठिकाणी माजी खासदार देविदास पिंगळे आणि त्यांचे कट्टर विरोधक शिवाजी चुंबळे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. या समितीच्या निवडणुकीत ९६.३४ टक्के मतदान झाले. पिंपळगाव समितीसाठी ९७.६० टक्के मतदान झाले. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल, आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील लोकमान्य परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत होताना पहायला मिळाली. पिंपळगाव बसवंत येथील मतदान केंद्रावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालेगावात मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे या दोन्ही गटांनी अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने आणि सात वर्षानंतर झालेल्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत ९७.६८ टक्के मतदान झाले. एकूण ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार देवळा ९७.५१ टक्के, घोटी ९३.१९, चांदवड ९८.५९, येवला ९८.४६, नांदगाव ९८.५०, सिन्नर ९८.१८, कळवण ९०.९१, लासलगाव ९७.३०, दिंडोरी ९६.९५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुकीत एकूण ९६.९० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिली. मतदानानंतर घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी आणि सिन्नर या समित्यांच्या मतमोजणीला सायंकाळी लगेच सुरूवात झाली. नाशिक, पिंपळगाव बसवंत, चांदवड, येवला, मालेगाव आणि लासलगाव या बाजार समित्यांची मतमोजणी शनिवारी होणार आहे. मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत रविवारी मतदान तर, सोमवारी मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदानावेळी कुठेही अप्रिय घटना घडली नाही. ज्या तक्रारी येत होत्या, त्यावर पोलीस यंत्रणा तत्परतेने कारवाई करीत होती. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. मतदान केंद्रात कॅमेरा वा तत्सम साधने नेण्यास प्रतिबंध होता. त्या अनुषंगाने सर्व केंद्रांवर मतदारांची तपासणी झाली.- शहाजी उमाप (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)