नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

प्रादेशिक परिवहन विभागाने महामार्गावर धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवित रिल करणाऱ्या चालकावर कारवाई केली आहे.
नाशिक : शहरातील रस्ते, महामार्गावर धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवित असताना कसरती करून तयार केलेले रिल समाजमाध्यमांत प्रसारित करणाऱ्या चालकाचा शोध घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली गेली असून त्याची मालमोटार जमा करण्यात आली आहे. या कारवाईनंतर चालकाने वाकडीतिकडी गाडी चालवून समाजमाध्यमांत चित्रफिती अपलोड करणार नसल्याचा माफीनामाही समाजमाध्यमांत सादर केला आहे.

ओमकार परमार (२०) असे या वाहनचालकाचे नाव आहे. परमारकडे अशोक लेलँड प्रकारातील मालमोटार आहे. संबंंधिताकडून ती शहरातील रस्ते व महामार्गावर अतिशय धोकादायकपणे चालविली जात होती. रहदारीचा विचार न करता मालमोटार चालविताना अपघातांना निमंत्रण देण्याचे काम त्याच्याकडून घडण्याची धास्ती अन्य वाहनधारकांसह नागरिकांना वाटत होती. महत्वाची बाब म्हणजे. चालक परमार अशाप्रकारे मालमोटार जाणीवपूर्वक चालवत होता. तो या कसरतींच्या चित्रफिती तयार करायचा. नंतर त्या समाजमाध्यमांत टाकून त्याचा प्रसार करीत होता. या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहायक मोटार वाहन निरीक्षक राजेश पवार यांनी या वाहनाचा शोध घेऊन कारवाई केली. चालक ओमकार परमारवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्याची मालमोटार जमा करण्यात आली आहे. या कारवाईनंतर त्याच्याकडून चित्रफित तयार करून घेण्यात आली. आरटीओची माफी मागत पुन्हा धोकादायकपणे वेडीवाकडी मालमोटार चालवणार नाही आणि या कसरतींच्या चित्रफिती समाजमाध्यमांत प्रसारित करणार नसल्याचे परमारकडून कबूल करुन घेण्यात आले.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या ओमकार परमारचा वाहन चालविण्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला गेला असून त्याच्या मालमोटारीचा परवानाही १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. – राजेश पवार (सहायक मोटार वाहन निरीक्षक, आरटीओ, नाशिक)