नाशिक, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांविरुध्द कारवाईचे संकेत

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून अटकेचे आज्ञापत्र

नाशिक : वेठबिगारीसाठी मुलांच्या विक्री प्रकरणात साक्षीदार म्हणून अनुपस्थित राहिल्याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक राकेश ओला या चार अधिकाऱ्यांना अटक आज्ञापत्र (वाॅरंट) बजावल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन याविषयी विचार विनिमय केला. गेल्यावेळी आयोगाचे पत्र उशिराने मिळाल्याने सुनावणीस उपस्थित राहता आले नव्हते. पुढील सुनावणीला आपल्यासह सर्व अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.

नाशिक, अहमदनगरसह आसपासच्या भागातून आदिवासी कातकरी समाजातील सहा ते १५ वयोगटातील अनेक मुलांची वेठबिगारीसाठी विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी उघड झाला होता. इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील गौरी आगिवले या १० वर्षाच्या मुलीच्या मृत्युमुळे हे वास्तव उघड झाले होते. या वेठबिगारी प्रकरणाची राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग चौकशी करीत आहे. त्या अनुषंगाने नाशिक आणि नगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना साक्षीदार म्हणून नऊ जानेवारी २०२३ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु ते गैरहजर राहिले. त्यामुळे या चारही अधिकाऱ्यांना अटक करून आमच्यासमोर घेऊन या, असे आदेश आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

हे वाचले का?  नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान

दोन जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना बजावलेल्या अटक आज्ञापत्राची अमलबजावणी कशी होणार, याबद्दल तर्कवितर्क व्यक्त होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गतवेळी आयोगाचे पत्र उशिराने मिळाल्यामुळे आम्हाला तारखेला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. एक फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्यासह पोलीस अधीक्षक आणि नगरचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे वाचले का?  भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार

प्रकरण नेमके काय ?

उभाडे येथील १० वर्षाच्या मुलीच्या मृत्यूमुळे वेठबिगारीचा धक्कादायक प्रकार उघड झाला. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील वेठबिगार म्हणून विकलेल्या आदिवासी मुलांची पोलिसांनी सुटका केली. चौकशीत प्रत्येकी दोन ते पाच हजार रुपये, एखादी मेंढी किंवा मद्य देऊन हे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. दलालाने मेंढ्या चारण्याच्या कामासाठी बहुतेक मुले विकली. त्यांना मालक दररोज पहाटे उठवून दूध काढायला लावायचे. काम चुकले तर मारहाण केली जायची. आई-वडिलांशी त्यांची भेट होत नव्हती. रात्री विहिरीतून पाणी काढायला लागायचे. मालक पोटभर खायला द्यायचा नाही, अशा गुलामगिरीच्या कथांनी या प्रश्नाचे भयावह स्वरुप अधोरेखीत केले. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी अहवालासह उपस्थित राहणे अपेक्षित होते.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव