नाशिक : नदीपात्रात राडारोडा टाकल्यास कारवाई; मनपा आयुक्तांचा इशारा

शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीपात्रात कचरा तसेच राडारोडा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ही उपनदी आक्रसत असून तिच्या प्रवाहात अडथळे येण्याची शक्यता आहे.

नाशिक : शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीपात्रात कचरा तसेच राडारोडा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ही उपनदी आक्रसत असून तिच्या प्रवाहात अडथळे येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर, नदीपात्रात राडारोडा टाकल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाईचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांनी दिला आहे.

बानायत यांनी नंदिनी नदीची पाहणी केली. नंदिनी ही गोदावरीची उपनदी आहे. पिंपळगाव बहुला ते आगरटाकळी असे शहरातून सुमारे १५ किलोमीटरचे अंतर ती पार करते. या मार्गात अनेक ठिकाणी कचरा, राडारोडा पात्रात फेकला जातो. अतिवृष्टीच्या काळात त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. निर्माल्य, कचरा फेकला जाऊ नये म्हणून वर्षभरापूर्वी उंटवाडी रस्त्यावरील पुलावर संरक्षक जाळी बसविण्यात आली होती. परंतु, नदीचा शहरातून बराच प्रवास होत असल्याने इतरत्र ते प्रकार घडत असल्याचे चित्र आहे.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

मागील काही वर्षात विविध कारणांनी नदीचे पात्र संकुलित झाले आहे. त्यात राडारोडा येत राहिल्यास प्रवाहात अडथळे निर्माण होतील. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त बानायत यांनी नदीपात्रात राडारोडा टाकला जाणार नाही, याची विभागीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे सूचित केले. शिवाजी वाडी पुलावरुन त्यांनी पात्राची तसेच आसपासच्या परीसराची पाहणी केली. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी मुख्य रस्त्यासह पुलावर निर्माल्य कलश ठेवावे. नदीपात्र आणि लगतचा परीसर स्वच्छ राखण्याचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राष्ट्रीय छात्र सेना पथक (एनसीसी) विद्यार्थ्यांच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबविली जाते.

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

सुधारित पूररेषेसाठी कार्यवाही

नंदिनी नदीचा प्रवाह सुरळीत राखण्यासाठी यंत्रणेचा नियमित वापर करून अडथळे दूर करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. पावसाळापूर्व कामांतर्गत मनपाच्या बांधकाम विभागाकडून पात्रातील अडथळे दूर करण्यात आले होते. जेसीबी आणि मनुष्यबळाच्या आधारे हे काम झाले. आता यंत्राची मदत घेतली जाईल. नदीची पूररेषा सुधारीत करण्यासाठी शासन यंत्रणेकडून कार्यवाही सुरु असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज