नाशिक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक परवाना रद्दचा बडगा; ८८ चालकांवर कारवाई

वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक परवाना रद्द करण्याचा बडगा वाहतूक पोलिसांनी उगारला आहे.

नाशिक : वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक परवाना रद्द करण्याचा बडगा वाहतूक पोलिसांनी उगारला आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत ८८ चालकांचे वाहतूक परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाला सादर करण्यात आले आहेत. या शिवाय, शहरात राबविलेल्या धडक मोहिमेत तिघांना घेऊन दुचाकी दामटणाऱ्या ४५४ आणि हेल्मेट परिधान न करणाऱ्या ४३५९ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

काही वर्षांपासून शहरात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्युंची संख्या वाढत आहे. ही प्राणहानी टाळण्यासाठी दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी आजवर प्रबोधन व कारवाई हे दोन्ही मार्ग स्वीकारूनही फारसा फरक पडत नसल्याचे चित्र आहे. दुचाकीवर सर्रास तिघांना घेऊन प्रवास केला जातो. नियमांचे पालन न करणाऱ्या अशा वाहनधारकांविरोधात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जात आहे.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

वाहतूक शाखेच्या चारही युनिटतर्फे २८ जून ते नऊ जुलै या कालावधीत वेगवेगळ्या भागात विशेष मोहीम राबविली. त्यात १२ दिवसांत तब्बल ४३५९ विनाहेल्मेट वाहनधारक हाती लागले. संबंधितांकडून २१ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याच काळात दुचाकीवर तिघांना घेऊन प्रवास करणाऱ्या ४५४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून चार लाख ५४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पुढील काळात कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करावे, तिघांना घेऊन दुचाकीवर प्रवास करू नये असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

हे वाचले का?  चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर.

बेपर्वा वाहनधारक

अपघातांचे प्रमाण कमी करणे, त्यातील संभाव्य प्राणहानी रोखणे यासाठी वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु, वारंवार कारवाई करूनही अनेकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे उघड झाल्याने अशा वाहनधारकांचा वाहतूक परवाना रद्द करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८८ चालकांचे वाहतूक परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

२६ लाखहून अधिकची दंड वसुली

शहरात वेगवेगळ्या भागात हजारो वाहनांची तपासणी सुमारे पाच हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या ४३५९ वाहनधारकांकडून २१ लाख ७९ हजार ५०० तर तिघांना घेऊन प्रवास करणाऱ्या ४५४ वाहनधारकांकडून चार लाख ५४ हजार असा एकूण ४८१३ वाहनधारकांकडून तब्बल २६ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हे वाचले का?  अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात