नाशिक : न्याय मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकेचा मुख्यमंत्र्यांना दंडवत

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी येथे दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका अंगणवाडी सेविकेने निवेदन देत थेट दंडवत घातल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी येथे दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका अंगणवाडी सेविकेने निवेदन देत थेट दंडवत घातल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित महिलेशी चर्चा करुन अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

शहरात १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवनातील मैदानावर त्याचे उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवर चाललेल्या तयारीची मुख्यमंत्री शिंदे यांनी सायंकाळी पाहणी केली. मुख्यमंत्री येणार म्हणून दुपारपासून काही अंगणवाडी सेविका मागण्यांचे फलक घेऊन तपोवन परिसरात दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना सुरक्षित अंतरावर ठेवले होते. असे असताना एक अंगणवाडी सेविका थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. तपोवन मैदानावर मुख्यमंत्री शिंदे हे वाहनातून उतरून पायी जात असताना संबंधित महिलेने मुख्यमंत्र्यांच्या हाती निवेदन देत दंडवत घातला. आम्ही कित्येक दिवसांपासून उपाशी असल्याची व्यथा मांडली. अकस्मात घडलेल्या प्रकाराने काहिसा गोंधळ उडाला. महिला पोलिसांनी संबंधित महिलेला बाजूला नेले.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती देत मुख्यमंत्र्यांनी अन्य मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे संबंधित महिलेने प्रसारमाध्यमांना सांगितले. अंगणवाडी सेविका ३६ दिवसांपासून संपावर असून आमची उपासमार होत आहे. आम्ही अल्पशा मानधनावर काम करतो. न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी, वेतनश्रेणी लागू करणे, निवृत्तीवेतनाचा लाभ देणे आदी मागण्या मान्य करून संप मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अंगणवाडी सेविकेमार्फत करण्यात आली.