नाशिक : फोटो काढणं बेतलं जिवावर, वालदेवी धरणात ६ जणांचा बुडून मृत्यू! मृतांमध्ये ५ मुलींचा समावेश!

पाण्यात उभं राहून फोटो काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

एकीकडे करोनामुळे होणारे मृत्यू पाहण्याची वेळ राज्यावर रोज येत असताना नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या ९ मुला-मुलींपैकी ६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी सकाळी सर्व ६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. पाण्यात उभं राहून फोटो काढताना पाय घसरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हे वाचले का?  कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब

नेमकं झालं काय?

लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये सर्वत्र हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे सोनी गमे (१२ वर्षे) या आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे मित्रमैत्रिणी थेट वालदेवी धरण परिसरात गेले. त्यांनी सोबत केक देखील नेला होता. मात्र, यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात त्यापैकी एकाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी इतरांनीही पाण्यात उड्या टाकल्या. यामध्ये आरती भालेराव (२२), हिम्मत चौधरी (१६), नाजिया मनियार (१९), खुशी मणियार (१०), ज्योती गमे (१६) आणि सोनी गमे (१२) या सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले समाधान वाकळे, प्रदीप जाधव राहणार सिंहस्थनगर आणि सना नजीर मणियार राहणार पाथर्डी फाटा हे तिघे जण सुदैवाने बचावले आहेत.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

रात्री उशिरापर्यंत सुरू होतं शोधकार्य

संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आधी या मुलांपैकी एकजण पाण्यात घसरून पडल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी इतरांनी देखील पाण्यात उड्या टाकल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं. मात्र, रात्रीच्या अंधाात दिसत नसल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं.

शनिवारी सकाळपासूनच पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं. सकाळी साधारण ९ वाजेपर्यंत बुडालेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या सर्वांचे मृतदेह नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.