नाशिक मनपा शाळांमध्ये पोषाख संहितेची तयारी, शिक्षिकांकडून प्रतिसाडी एक हजार रुपयांचे संकलन

महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना एकच पोषाख संहिता लागू करण्याची तयारी शिक्षण मंडळाने केली आहे.

नाशिक : महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना एकच पोषाख संहिता लागू करण्याची तयारी शिक्षण मंडळाने केली आहे. त्या अंतर्गत महिला शिक्षकांसाठी परस्पर विशिष्ट साडीची निवड केली गेली तर, पुरुषांना मात्र वगळण्यात आल्याची तक्रार आहे. पोषाख संहितेला शिक्षक वर्गातून विरोध होत असताना शिक्षण मंडळाने नव्या पोषाखाचा भार महिला शिक्षकांवर टाकून प्रतीसाडी एक हजार रुपये संकलित करण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, शिक्षण विभागाने आपल्यावरील आक्षेप फेटाळले आहेत.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी पोषाख संहिता (ड्रेसकोड) लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने मध्यंतरी दिले होते. महिला शिक्षकांनी साडी, चुडीदार-सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने, तर पुरुष शिक्षकांनी शर्ट, ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव करावा, असे सुचवले. शाळेने शिक्षकांसाठी एकच पोशाख संहिता, परिधान करायच्या पेहरावाचा रंग निश्चित करावा, पेहरावाला शोभतील, अशी पादत्राणे असावीत, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच पेहराव असेल, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. या निर्णयाचा संदर्भ देत मनपाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी सर्व शाळेतील शिक्षकांना एकच पोषाख संहिता लागू करण्याचे ठरवले आहे.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

मनपाच्या शहरात ८८ प्राथमिक आणि १२ माध्यमिक शाळा असून तिथे एक हजारहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. शाळानिहाय पोषाख संहिता आधीपासून अस्तित्वात आहे. पण आता मनपाच्या सर्व शाळेत एकच पोषाख संहिता लागू केली जात आहे. त्यास शिक्षक वर्गातून विरोध झाला. पण, दबावामुळे महिला शिक्षकांना त्यासाठी तयार करण्यात आले. शिक्षण मंडळाने पोषाख निवडीविषयी महिला शिक्षकांशी चर्चा केली होती. प्रातिनिधीक स्वरुपात काहींना साडीचा रंग व तत्सम बाबींची निवड करण्यास सांगितले गेले. ही प्रक्रिया प्रगतीपथावर असताना मंडळाने परस्पर साडीची निवड केली. साडीची निवड करण्यासाठी धावपळ करणाऱ्या शिक्षकांना विश्वासात न घेता साडीचा व्यवसाय असणाऱ्या परिचिताकडून या साड्या खरेदी केल्या जात असल्याची तक्रार होत आहे. याकरिता प्रतिसाडी एक हजार रुपये महिला शिक्षकांकडून संकलित केले जात आहेत. पोषाख संहितेचा भार शिक्षकांवर पडला आहे. महिलांच्या गणवेशासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या शिक्षण मंडळाने पुरुष शिक्षकांना मात्र कुठलाही पेहराव निश्चित केलेला नाही. त्यांची ना बैठक झाली, ना काही पोषाख निश्चित झाला. पोषाख संहितेची केवळ महिला शिक्षिकांवर सक्ती का, आर्थिक भुर्दंड आम्ही का सोसायचा, असे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

तक्रारी तथ्यहीन

मनपा शाळेतील पुरुष शिक्षकांसाठी आधीच काळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढरा शर्ट ही पोषाख संहिता निश्चित झाली आहे. महिला शिक्षकांनी त्यांच्यासाठी साडी निवडली असून अद्याप ती अंतिम झालेली नाही. स्वखर्चाने त्यांना ती खरेदी करायची आहे. त्यासाठी पैसे संकलित केले जात नाहीत. त्यांना योग्य वाटेल तिथून ते खरेदी करू शकतात. साडीची निवड करण्यासाठी समिती स्थापन झालेली नव्हती. महिला शिक्षकांनी एकमत करावे आणि त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली. शिक्षण मंडळाच्या पातळीवर यासंदर्भात निर्णय होणार नाही. कुणीतरी या विषयात चुकीची माहिती देत आहे. मनपा शाळेत व्यवस्थितपणा असावा, हा संहितेचा उद्देश आहे. महिला शिक्षिकांना ही संहिता नको असल्यास शिक्षण मंडळाचे काही म्हणणे नाही. मात्र, शासन निर्णयाचे उल्लंघन होईल.बी. टी. पाटील (शिक्षणाधिकारी, नाशिक महानगरपालिका)