नाशिक: रस्ते कामातील नियोजनाअभावी दुचाकीस्वाराचा मृत्यू

चोपडा लॉन्ससह अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे करताना आवश्यक ती दक्षता घेतली जात नाही.

पावसाळ्यात शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे वाहनधारकांच्या जिवावर बेतत आहेत. चोपडा लॉन्सजवळ रस्त्याच्या कामामुळे एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्या मार्गावर मध्यभागी ठेवलेल्या पेव्हर ब्लॉकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चोपडा लॉन्ससह अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे करताना आवश्यक ती दक्षता घेतली जात नाही. त्याची परिणती अपघातांमध्ये होत असल्याचे चित्र आहे.

नीलेश मराठे (२५, श्रीकृष्ण अपार्टमेंट, गणेशवाडी, अमरधाम रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मराठे हे रामवाडीकडून गंगापूर रस्त्याकडे दुचाकीने निघाले होते. चोपडा लॉन्सजवळ अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे चोपडा लॉन्स पूल ते जुना गंगापूर नाका सिग्नल दरम्यान एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेला पेव्हर ब्लॉक अर्थात सिमेंटचा मोठा दगड दुचाकीस्वाराच्या अपघाताचे कारण ठरला. त्या दगडाला दुचाकी धडकून नीलेश खाली कोसळला.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कुठल्याही रस्त्याचे काम करताना महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी आणि संबंधित ठेकेदाराने सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने काय नियोजन करावे, याची स्पष्टता केली जाते. चोपडा लॉन्स परिसरातील रस्ते कामात ही नियमावली पाळली गेली का, हाच प्रश्न आहे. या भागातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. वाहतूक पोलिसांकडून नियमन केले जात असले तरी दुहेरी मार्गावरून वाहने सुरक्षितपणे मार्गस्थ होतील याची व्यवस्था केलेली नाही. या ठिकाणी एका बाजूकडील रस्त्याच्या विभागणीसाठी संबंधित सिमेंटचा दगड ठेवला गेल्याचे दृष्टीपथास पडते. पावसाळ्यात ज्या ज्या भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत, तिथे बिकट स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य