नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवात महाएक्स्पो लक्षवेधक

नवउद्यम अंतर्गत देशाच्या विकासात महाराष्ट्र काय योगदान देऊ शकेल, याचे उत्तर येथील हनुमान नगरात भरलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील युवा एक्स्पो विभागात सापडते.

नाशिक – नवउद्यम अंतर्गत देशाच्या विकासात महाराष्ट्र काय योगदान देऊ शकेल, याचे उत्तर येथील हनुमान नगरात भरलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील युवा एक्स्पो विभागात सापडते. राज्यातील युवकांनी कृषी, संरक्षण, वाहन, इलेक्ट्रिकसह वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित नवे प्रकल्प मांडले आहेत. विशेष म्हणजे, देशपातळीवर तृणधान्य वर्ष साजरे होत असताना बहुतांश प्रकल्प तृणधान्य खाद्यपदार्थांवर आधारित आहेत.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

शहरात आयोजित २७ व्या राष्ट्रीय महोत्सवात देशातील सात हजारांहून अधिक युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी वक्तृत्व, निबंध, गायन, नृत्य अशा विविध स्पर्धा होत आहेत. हनुमान नगरातील महोत्सवाच्या केंद्रात महाराष्ट्र देशाला काय देऊ शकेल, या अनुषंगाने महा एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी राज्यातील दहापेक्षा अधिक युवकांच्या गटांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर काम केले आहे.

सातपूर येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी गिर्यारोहकाचा अपघात झाल्यास तो कुठे आहे, किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह कुठे आहे, हे शोधण्यासाठी उपयुक्त असे यंत्र तयार केले आहे. पावसाळ्यात विद्युत खांबांमधून विद्युत प्रवाह उतरतो. बऱ्याचदा यामुळे अपघात होतो. हे टाळण्यासाठी असे खांब कसे लक्षात येतील, हे शोधणारे यंत्रही याठिकाणी आहे. काहींनी कागदापासून तयार केलेल्या गणपती मूर्ती आहेत. याशिवाय तृणधान्यावर आधारीत बिस्कीट, चिक्की, लाडु, रवा, डोसा, इडली, पीठ यासह विविध खाद्यपदार्थ आहेत. ड्रोन, इलेक्ट्रिक बाईक, भ्रमणध्वनी अॅप यासह वेगवेगळे प्रकल्प तयार केले आहेत.