नाशिक : रेल्वे प्रवाशाची बॅग चोरणाऱ्यास अटक

मुंबई येथील मेरी अल्वा या भोपाळ येथे रेल्वेने जात असतांना पहाटेच्या सुमारास चोरट्याने त्यांची पर्स लंपास केली.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक – रेल्वे प्रवासात प्रवाशांची बॅग चोरणाऱ्या गुन्हेगारास जेरंबद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकला यश आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सुचनेनुसार विविध शाखांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई येथील मेरी अल्वा या भोपाळ येथे रेल्वेने जात असतांना पहाटेच्या सुमारास चोरट्याने त्यांची पर्स लंपास केली. यामध्ये १४ तोळ्याचे दागिने, एक भ्रमणध्वनी असा मुद्देमाल होता. या प्रकरणी नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

या गुन्ह्याचा तपास करत असतांना याबाबतची माहिती समाज माध्यमात देण्यात आली होती. गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने संशयिताची ओळख पटवण्यात आली. संशयित भारत नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भारत नगरात सापळा रचत संशयित अश्रफ रौफ शेख (१९) याला ताब्यात घेतले. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले १४ तोळे दागिने, भ्रमणध्वनी असा आठ लाख, ६५ हजार ९१८ रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संशयिताला ताब्यात घेत नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले.

हे वाचले का?  नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी