नाशिक : लग्नपत्रिकेतील वधू-वराच्या नावांवरुन ‘लव्ह जिहाद’चा आरोप, धमक्यांमुळे लग्नसमारंभ केला रद्द

“पत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झाली आणि आंदोलन करु, मेसेज, फोन कॉल करुन लोक आम्हाला त्रास देऊ लागले. अनोळखी लोकांनीही आम्हाला लग्न रद्द करण्यासाठी फोन केला”

एकमेकांवर प्रेम करणारे ते दोघे लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये बांधले जाणार होते. दोन कुटुंब आणि दोन वेगळ्या धर्मातील संस्कृती या लग्नाच्या माध्यमातून एकत्र येणार होत्या. मात्र या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली अन् होत्याचं नव्हतं झालं. लव्ह जिहादच्या आरोपांमुळे ठरलेलं लग्न मोडण्याची वेळ या कुटुंबावर आल्याची धक्क्कादायक घटना घडलीय पुरोगामी विचारांसाठी देशासमोर ज्या राज्याचा आदर्श ठेवला जातो त्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये.

नाशिकमधील दोन्ही कुटुंबांनी मागील आठवड्यामध्ये लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. २८ वर्षीय मुलीचं लग्न मुस्लीम मुलासोबत हिंदू पद्धतीप्रमाणे होणार होतं. मात्र या मुलीच्या समाजातील लोकांनी आंदोलन करत या लग्नाला विरोध केला. हे लग्न म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा आरोप या सामाजातील लोकांनी मुलाच्या कुटुंबियांच्या निर्णयाबद्दल बोलताना केला. मात्र हे प्रकरण इथेच थांबलं नाही.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

समाजाच्या विरोधाला सामोरे जाताना कुटुंबाने लग्न समारंभ रद्द केला. मात्र मुलीची आवड आणि तिने मुस्लीम मुलासोबत लग्न करण्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं तिच्या कुटुंबियांनी ठरवलं. मुलीच्या कुटुंबियांनी तिचं जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेला नसल्याचं सांगतं आधीच या दोघांचं कोर्ट मॅरेज झाल्याचं सांगितलं.

नाशिकमधील प्रसिद्ध ज्वेलर्स प्रसाद आडगांवकर हे मुलीचे वडील आहेत. माझी मुलगी रसिका ही दिव्यांग आहे. आम्ही तिच्यासाठी मुलगा शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र ती दिव्यांग असल्याने आम्हाला तिला स्वीकारणारा मुलगा सापडला नाही. दरम्यान रसिका आणि तिचा वर्गमित्र असणाऱ्या आसिफ खानने एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं आम्हाला सांगितलं. आमची कुटुंब एकमेकांना मागील काही वर्षांपासून ओळखत असल्याने आम्ही लग्नाला होकार दिला, असं आडगांवकर सांगतात.

मे महिन्यामध्ये नाशिकमधील कोर्टामध्ये नोंदणी पद्धतीने या दोघांनी विवाह केला. त्यानंतर १८ जुलै रोजी रसिका सासरी जाण्याआधी हिंदू परंपरेनुसार लग्न करण्यालाही मुलाच्या घरच्यांनी परवानगी दिली. जवळच्या काही नातेवाईकांच्या परिस्थितीमध्ये नाशिकमधील हॉटेलमध्ये हा सामरंभ पार पडणार होता. मात्र लग्नाची पत्रिका व्हॉट्सअपवरील अनेक ग्रुपवर व्हायरल झाली आणि आंदोलन करु, मेसेज, फोन कॉल करुन लोक आम्हाला त्रास देऊ लागले. अगदी अनोळखी लोकांनीही आम्हाला लग्न रद्द करण्यासाठी फोन केल्याचं आडगांवकर यांनी सांगितलं.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

९ जुलै रोजी आडगांवकर यांना त्यांच्या समाजातील लोकांनी भेटीसाठी बोलवलं. या बैठकीदरम्यान समाजातील लोकांनी हा समारंभ करु नका असा सल्ला दिल्याचं आडगांवकर सांगतात. अखेर या धमक्या आणि इशारांमुळे लग्न समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. “आमच्यावर समाजाने आणि इतरांनी खूप दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यामुळेच आम्ही लग्न समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला,” असं कुटुंबातील अन्य एका सदस्याने सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी हा समारंभ रद्द करत असल्याचं पत्र समाजातील लोकांना दिलं.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम


नाशिकमधील सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या सुनील महाळकर यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे. “आम्हाला मिळालेल्या पत्रानुसार हा समारंभ रद्द करण्यात आल्याचं कुटुंबियांनी कळवलं आहे,” असं महाळकर म्हणाले. मात्र त्यावेळी रसिका आणि आसिफ यांचं लग्न कायम राहणार असून दोन्ही कुटुंबिय त्यांच्या पाठीशी असून केवळ समारंभ रद्द करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.