नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

गणवेश खरेदीतील गैरव्यवहार पाहता काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यावर गणवेशासाठी पैसे दिले जात होते. मात्र ते पैसेही वेळेत येत नसल्याने पुन्हा गणवेश देण्यास सुरूवात झाली.

नाशिक: स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू असतांना नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश प्राप्त झालेला नाही. यामुळे विद्यार्थी यंदा नवीन शालेय गणवेशाशिवाय स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभागी होतील.

राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन गणवेश दिले जात होते. गणवेश खरेदीतील गैरव्यवहार पाहता काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यावर गणवेशासाठी पैसे दिले जात होते. मात्र ते पैसेही वेळेत येत नसल्याने पुन्हा गणवेश देण्यास सुरूवात झाली. यंदा नव्या शैक्षणिक वर्षात एक तयार गणवेश विद्यार्थ्यांना दिला जाणार होता, दुसऱ्या गणवेशासाठी कापड दिले जाणार होते. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटूनही विद्यार्थ्यांना ना गणवेश मिळाला ना कापड. राज्यात एक लाखांहून अधिक जिल्हा परिषद शाळेत ४४ लाख, ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून मोफत गणवेशासाठी ते पात्र आहेत. नाशिक जिल्ह्यातील तीन हजार २६६ शाळांमधील दोन लाख ६६ हजार विद्यार्थी मोफत गणवेशासाठी पात्र असताना अद्याप विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोहचलेला नाही. यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावर किंवा गणवेशाविना सहभागी व्हावे लागणार आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

याविषयी एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे यांनी, शिक्षणासारख्या विभागाकडून अशा पध्दतीने काम होत असेल तर इतर विभागांचे विचारायलाच नको, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारकडे गणवेशासाठी पैसे नसतील तर याची आम्हाला आधीच माहिती सांगणे आवश्यक होते. सरकारला बहिणी झाल्या लाडक्या आणि भाचे राहिले उघडे, अशी स्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले.

अद्याप सरकारकडून गणवेशासंदर्भात निधी आलेला नाही. जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव या दोनच तालुक्यातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत. अन्य तालुक्यातील विद्यार्थी अद्यापही नवीन गणवेशापासून वंचित आहेत. वरिष्ठ पातळीवरून गणवेश किंवा कापड अद्याप आलेले नाही.प्रवीण जाधव (सम्रग शिक्षा अभियान)