नाशिक विभागात महिनाभरात करोनाचे १ लाख १२ हजार रुग्ण

सद्यस्थितीत ४८ हजार ३८७ सक्रिय रुग्ण असून त्यातील २३ हजार ६४ गृह आणि १५ हजार ६४० संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

५२४ जणांचा मृत्यू

नाशिक : विभागात फेब्रुवारीत बऱ्याच अंशी आटोक्यात आलेल्या करोनाचा मार्चमध्ये अक्षरश: कहर झाला असून या महिन्यात आतापर्यंत तब्बल एक लाख १२ रुग्ण आढळले. या काळात ५२४ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.८९ टक्के असून मृत्यूदर १.५ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

मागील २४ तासात विभागात करोनाचे साडेआठ हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले तर ४३१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. विभागाची करोनाची स्थिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी मांडली. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढली. फेब्रुवारीच्या अखेरीस एकूण रुग्णांची दोन लाख ७२ हजारवर असणारी संख्या आता तीन लाख ८४ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. यातील जवळपास तीन लाख ३० हजार रुग्ण उपचाराअंती करोनामुक्त झाले. आतापर्यंत करोनामुळे पाच हजार ७६३ जणांचा मृत्यू झाला.

हे वाचले का?  Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी

सद्यस्थितीत ४८ हजार ३८७ सक्रिय रुग्ण असून त्यातील २३ हजार ६४ गृह आणि १५ हजार ६४० संस्थात्मक अलगीकरणात आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २४ हजार २५०, जळगाव १० हजार ९४४, नंदुरबार पाच हजार ४०, धुळे ३९३६ आणि नगर जिल्ह्यातील ४२१७ रुग्णांचा समावेश आहे. विभागात बाधितांच्या संपर्कातील एक लाख ३१ हजार ७९६ जणांचे निवासस्थानी आणि १३१९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ७६ हजार ३१ जणांचे विलगीकरण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात २९ हजार ३२९, धुळे जिल्ह्यात २० हजार ७६०, नगर जिल्ह्यात ४८०६ आणि नाशिक जिल्ह्यात २१८९ जणांचा समावेश आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

अतिदक्षता विभागात १२१५ रुग्ण

विभागात सध्या ३९६ जण व्हेंटिलेटर तर ८१९  प्राणवायू व्यवस्थेवर असे एकूण १२१५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. अतिदक्षता विभागात नसलेल्या २१६५ जणांना प्राणवायूचा आधार द्यावा लागत आहे. २४ तासात विभागात ३५ हजार ९९० जणांची चाचणी करण्यात आली. यात १४ हजार ६३६ आरटीपीसीआर, २१ हजार ३१४ जलद प्रतिजन चाचण्यांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण सर्वात कमी ८२२ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात १८ हजार ९५२, जळगाव ८८४६, धुळे ४८६०, नगर जिल्ह्यात २५१० चाचण्या झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.