शहरात काही मतदारांनी केंद्र बदलल्याच्या तक्रारी केल्या. कुटुंबातील एका सदस्याचे नाव जवळच्या केंद्रावर तर, दुसऱ्यांची नावे दुरवरील केंद्रावर गेल्याचे सांगितले जाते.
नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात ४९२२ केंद्रांवर बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोडसह अनेक भागात सकाळपासून रांगा लागल्या होत्या. शहरात काही मतदारांनी केंद्र बदलल्याच्या तक्रारी केल्या. कुटुंबातील एका सदस्याचे नाव जवळच्या केंद्रावर तर, दुसऱ्यांची नावे दुरवरील केंद्रावर गेल्याचे सांगितले जाते. यामुळे जुन्या मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांना नव्या केंद्रांवर धावपळ करावी लागली. काही केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. परंतु, लागलीच यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याचा दावा निवडणूक शाखेने केला आहे. प्रारंभीच्या दोन तासात ६.९३ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानास सुरूवात झाली. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७५ % नेण्यासाठी उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचा परिणाम प्रारंभापासून दिसत आहे. १५ मतदारसंघात एकूण १९६ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांसह शासकीय अधिकाऱ्यांनी प्रारंभीच मतदान करण्यास प्राधान्य दिले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सपत्नीक मतदान केले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सकाळीच मतदान करीत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. मतदान सुरू होत असताना येवल्यासह अनेक मतदारसंघात काही यंत्रात तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे समोर आले. जिथे जिथे असे प्रकार घडले तिथे लागलीच मतदान यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.
सकाळी सात ते नऊ या दोन तासात तीन लाख ५० हजार ६२२ (६.९३ टक्के) मतदारांनी मतदान केले. मालेगाव मध्य मतदारसंघात (९.९८ टक्के), दिंडोरी (९.७१ टक्के) कळवण ((८.९१ टक्के), सिन्नर (८.०९ टक्के) या ग्रामीण भागात तुलनेत अधिक मतदान झाले. तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व (६.४३ टक्के), नाशिक मध्य (७.५५ टक्के), नाशिक पश्चिम (६.२५ टक्के) व देवळालीत (४.४२ टक्के) मतदान झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नांदगावमध्ये (४.९२ टक्के), मालेगाव बाह्य (६.३०), बागलाण (६.११), चांदवड (६.४९), येवला (६.५८), निफाड (५.४०) आणि इगतपुरीत (६.८५ टक्के) मतदान झाले.
मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी या तीन मतदारसंघात प्रत्येकी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने तेथे दोन यंत्रांवर मतदान होत आहे. नांदगाव मतदारसंघात तीन, सिन्नरमध्ये दोन आणि चांदवडमध्ये एक अशी एकूण सहा संवेदनशील मतदान केंद्रांवर यंत्रणेने अधिक दक्षता घेतली आहे. प्रत्येक मतदारसंघात तीन केंद्र यानुसार जिल्ह्यात एकूण ४५ केंद्रांवर कर्मचारी महिला मतदान प्रक्रिया महिला पार पाडत आहे. तसेच प्रत्येक मतदार संघातील एका केंद्रावर अपंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.