नाशिक : शांतीगिरी महाराजांची ‘श्रीमंती’, ३९ कोटींची मालमत्ता

राज्यातील विविध भागात जमीन, भूखंड व अन्य स्थावर मालमत्ता असणारे आणि थोडीथोडकी नव्हे तर, नऊ वाहने दिमतीला ठेवणारे स्वामी शांतिगिरी मौनगिरी महाराज हे तब्बल ३९ कोटींची मालमत्ता बाळगून आहेत.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्यातील विविध भागात जमीन, भूखंड व अन्य स्थावर मालमत्ता असणारे आणि थोडीथोडकी नव्हे तर, नऊ वाहने दिमतीला ठेवणारे स्वामी शांतिगिरी मौनगिरी महाराज हे तब्बल ३९ कोटींची मालमत्ता बाळगून आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची श्रीमंती उघड झाली.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

शांतिगिरी महाराज यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ६२ हजाराच्या आसपास आहे. त्यांच्याकडे ७१ लाख ६८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून कुठलेही दागिने व जडजवाहिर त्यांच्याकडे नाहीत. महाराजांची वाहने आणि स्थावर मालमत्तेत मुख्यत्वे गुंतवणूक आहे. जमीन, भूखंड आणि तत्सम मालमत्तेचे आजचे बाजारमूल्य ३८ कोटी, ८१ लाखांच्या घरात असून त्यांच्यावर ७५ हजार रुपयांचे कर्जही आहे.

आजवर त्यांनी ७० लाख ३५ हजारांची मालमत्ता खरेदी केली. छत्रपती संभाजीनगर, खुल्ताबाद, वैजापूर, कन्नड, भोकरदन, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, दिंडोरी, निफाड आणि रत्नागिरी आदी भागात त्यांच्या अर्धा एकर ते ११ एकरपर्यंत जमिनी आहेत. यातील काही जमिनी बक्षीसपत्राने तर काही दानपत्राने प्राप्त झाल्या आहेत. जमिनीप्रमाणे महाराजांकडे वाहनांची कमतरता नाही. सफारी, टाटा टेम्पो, मालवाहू, हायवा (डंपर), टीयुव्ही, टाटा ४०७, शालेय वाहतूक करणाऱ्या बस अशी तब्बल ६७ लाख रुपयांची नऊ वाहने त्यांच्या नावावर आहेत.