नाशिक शिक्षक मतदारसंघात आरोप-प्रत्यारोप

राज्यातील सत्तेत एकत्र असतानाही शिक्षक मतदारसंघात मात्र शिंदे गट आणि अजित पवार गट एकमेकांविरुद्ध ठाकले आहेत

नाशिक : सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट समोरासमोर आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहचला आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीही रिंगणात असल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असलेला हा विशाल मतदारसंघ असल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार किशोर दराडे, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रा. भाऊसाहेब कचरे, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात आहे. शिक्षक मतदारसंघ असला तरी अपवाद वगळता प्रमुख उमेदवार मात्र शिक्षक नव्हे तर, शिक्षण संस्थाचालक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मविआकडून संजय राऊत हे प्रचाराच्या मैदानात उतरल्याने शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली ते लक्षात येऊ शकेल.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

राज्यातील सत्तेत एकत्र असतानाही शिक्षक मतदारसंघात मात्र शिंदे गट आणि अजित पवार गट एकमेकांविरुद्ध ठाकले आहेत. मतदानाला अवघे तीन दिवस बाकी असतानाही शिंदे गटाकडून अजित पवार गटाने उमेदवार मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपण शांत राहावे, यासाठी आपल्या मुलाला शिंदे गटाकडून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला होता, असे अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांचे म्हणणे आहे. आपल्या पक्षाकडून कोणताही आदेश नसल्याने आपण उमेदवार म्हणून प्रचार करणारच आहोत, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नाशिक, अहमदनगर, जळगाव येथे शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम

जागा राखण्याचे शिंदे गटापुढे आव्हान‘शिक्षक मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका’

राज्याला शिक्षकांची मोठी परंपरा आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री जर शिक्षण, शिक्षकांचे शेअर बाजाराप्रमाणे भाव लावत असतील तर ही परंपरा खंडित होईल, अशी भीती वाटते. शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ राऊत नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला. मतदारसंघात काही उमेदवारांकडून शिक्षकांना विविध प्रलोभने दाखविण्यात येत असल्याविषयी चिंता व्यक्त केली.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग