नाशिक: शिधा मिळत नसल्याने निषेधार्थ शिधापत्रिकांचे पूजन

कष्टकरी, श्रमिक वर्गाला आजही स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर सहजासहजी शिधा मिळत नसल्याचे चित्र आहे.

कष्टकरी, श्रमिक वर्गाला आजही स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर सहजासहजी शिधा मिळत नसल्याचे चित्र आहे. शिधापत्रिका असूनही शिधा मिळत नसल्याने वैतागलेल्या आदिवासी बांधवांनी मंगळवारी इगतपुरी तहसीलदार कार्यालयात शिधापत्रिकेचे पूजन करुन प्रशासनाच्या अनास्थेचा निषेध केला. यावेळी कांदा, भाकर प्रसाद म्हणून अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली.

एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या शिधापत्रिकेचा प्रश्न हाती घेण्यात आला आहे. तहसील कार्यालयाकडून दोन वर्षांपूर्वी शिधापत्रिका दिल्या जात होत्या. मात्र त्या पत्रिकांवर अद्यापही धान्य दिले जात नाही. धान्य मिळावे यासाठी कार्यालयात दोन वर्षापासून सतत आदिवासी बांधव चकरा मारत असूनही कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर सर्व शिधापत्रिका धारकांनी एकत्र येत शिधापत्रिका प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे पूजन केले. शिधापत्रिकेला प्रसन्न हो, असे गाऱ्हाणे घातले गेले.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

याविषयी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी माहिती दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिम कातकरी कुटुंबाला तत्काळ शिधापत्रिका देऊन धान्य देणे आवश्यक आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाकडून कातकरी कुटुंबाला शिधापत्रिका देण्यात आल्या. परंतु, धान्य मिळाले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली आहे. शिधापत्रिका असूनही त्याना धान्य न दिल्याने पुरवठा अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मधे यांनी केली.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान