मखमलाबाद येथील शेतकरी कुटुंबातील आकाश काकड डेहरादून येथील भारतीय लष्करी प्रबोधिनीतून खडतर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करात लेफ्टनंट या पदावर अधिकारी बनून देशसेवेत रुजू झाला आहे.
नाशिक: अधिकाऱ्यांचे गाव असा लौकिक असलेल्या गावातील मखमलाबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मखमलाबाद येथील शेतकरी कुटुंबातील आकाश काकड डेहरादून येथील भारतीय लष्करी प्रबोधिनीतून खडतर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करात लेफ्टनंट या पदावर अधिकारी बनून देशसेवेत रुजू झाला आहे.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थित डेहरादून येथील आयएमए येथे दीक्षांत सोहळा पार पडला. आकाशचे शालेय शिक्षण स्वामीनारायण शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण के.टी.एच.एम. महाविद्यालयात झाले. लहानपणापासूनच त्याने लष्करात अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी त्याने १० वीला असतांना छत्रपती संभाजीनगर येथील एसपीआय संस्थेत प्रवेशासाठी प्रयत्न केले होते. मात्र तेथे त्याला अपयश आले. त्यानंतर त्याने हर्षल आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीए प्रवेश परीक्षा आणि एसएसबी मुलाखतीची तयारी केली होती. यावेळी आकाशने आपले मागील अपयश धुवून काढत एनडीएच्या गुणवत्ता यादीत देशात ३७ वा क्रमांक पटकावला. एनडीएच्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणातही आकाशने नेत्रदीपक कामगिरी केली होती. एनडीएच्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर आकाश एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी आयएमए येथे दाखल झाला होता. येथून अधिकारी झाल्यानंतर आकाश त्याच्या आवडीच्या जाट रेजिमेंटमध्ये दाखल झाला असून त्याची हिमाचल प्रदेश येथील धर्मशाळा येथे नियुक्ती झाली आहे.
आकाश शेतकरी कुटुंबातील असून त्याची आई कुसुम, वडील विलास, आजी गंगुबाई आणि आजोबा दत्तात्रय काकड हे सर्व शेती करतात. त्याच्या दोन बहिणी शिक्षण घेत असून धाकटा भाऊही आकाशप्रमाणेच एनडीएची तयारी करीत आहे. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील आकाश आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय लष्करात अधिकारी झाला आहे. त्याने मखमलाबादसोबतच संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे नाव मोठे केल्याची भावना सुदर्शन अकॅडमीच्या हर्षल आहेरराव यांनी व्यक्त केली.