दिवाळी बोनस मिळाला नाही आणि महिनाभराचे वेतनही थकीत असल्याच्या निषेधार्थ नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बसच्या वाहकांनी एकत्र येत सुरू केलेले काम बंद आंदोलन गुरूवारीही सुरू होते.
लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : दिवाळी बोनस मिळाला नाही आणि महिनाभराचे वेतनही थकीत असल्याच्या निषेधार्थ नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बसच्या वाहकांनी एकत्र येत सुरू केलेले काम बंद आंदोलन गुरूवारीही सुरू होते. दरम्यान, सिटी लिंक बससेवा व्यवस्थापनाच्या वतीने वाहन पुरविणारी संस्था, ठेकेदार यांच्याशी चर्चा करण्यात आली. संबंधितांनी ही सेवा सुरळीत रहावी यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. यातील काही पैसे कर्मचाऱ्यांया खात्यावर तातडीने जमाही झाले. मात्र ठेकेदार व वाहन पुरविणाऱ्या कंपनीच्या ताठर भुमिकेमुळे गुरूवारी सायंकाळ पर्यंत बस सेवा पुर्ण क्षमतेने सुरू होवू शकली नाही.
सिटी लिंकच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन सुरु केल्याने महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा एकदा ठप्प होऊन प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. या बससेवेला प्रारंभापासून कर्मचाऱ्यांच्या असहकार्याचे ग्रहण लागले आहे. त्यांच्या भूमिकेमुळे सिटीलिंक बससेवा वारंवार ठप्प होत आहे. गुरूवारी दिवसभरात बरेच प्रयत्न करूनही ही सेवा कार्यान्वित होऊ शकली नाही. महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा कर्मचारी संघटना आणि ठेकेदार यांच्यातील वादाने अडचणीत सापडत आहे. सिटीलिंक बस सेवेत कंत्राटी पध्दतीने वाहक कार्यरत आहेत. ते पुरविण्याचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला गेला आहे, त्याच्याकडून कर्मचाऱ्यांना वेतन, बोनस देण्यात दिरंगाई केली जात असल्याची तक्रार होत आहे. सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा विचार करून मनपा प्रशासनाने ठेकेदाराला दोन महिन्यांचे आगाऊ वेतन दिले होते. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. परंतु, संबंधिताने तो दिला नाही. या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली गेली. सिटीलिंकची सेवा ठप्प झाल्यामुळे महापालिकेत बैठकही पार पडली. परंतु, सकारात्मक तोडगा निघाला नाही. परिणामी, दिवसभर पासधारक व प्रवाश्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
दरम्यान, गुरूवारी बससेवा सुरू व्हावी यासाठी सिटी लिंक प्रशासन, ठेकेदार व वाहन पुरविणाऱ्या कंपनीची चर्चा सुरू होती. ठेकेदाराने बससेवा सुरू राहण्यासाठी एक कोटी मागितले. महापालिकेने तातडीने ५५ लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केले. मात्र संबंधितांच्या ताठर भुमिकेमुळे बस सेवा सायंकाळी उशीरा पर्यंत पुर्ण क्षमतेने सुरू होवू शकली नाही. महापुराण कथा ऐकण्यासाठी केवळ १०-१५ गाड्या सोडण्यात आल्या.