नाशिकचा पारा ९.१ अंशांवर

हंगामातील नीचांकी पातळी

हंगामातील नीचांकी पातळी

नाशिक : अवकाळी रिमझिम, सलग काही दिवस धुक्याची चादर यात अंतर्धान पावलेल्या थंडीचे जोरदार पुरागमन झाले असून सोमवारी सकाळी पारा ९.१ अंशांपर्यंत घसरून नव्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. वातावरणात अकस्मात बदल झाल्यामुळे कमालीचा गारठा जाणवत आहे.

यंदा थंडीचे दिवाळीत आगमन झाल्यामुळे अधिक काळ गारव्याची अनुभूती मिळणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. परंतु मध्यंतरीच्या रिमझिम अवकाळी पावसामुळे तीन-चार दिवस ढगाळ वातावरणात गेले. या काळात सूर्यदर्शनही झाले नव्हते. हे मळभ दूर झाल्यानंतर शहर आणि ग्रामीण भाग धुक्यांच्या दुलईत हरवला. इतके दाट धुके पडायचे की अवघ्या काही फुटांवरील काही दिसत नव्हते. सकाळी बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना दिवे लावून हळुवार मार्गक्रमण करावे लागले. तीन-चार दिवस धुक्याचे सकाळी उशिरापर्यंत सर्वत्र अस्तित्व जाणवले.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था श्रावणात बंद

या घटनाक्रमानंतर वातावरण पुन्हा एकदा बदलले असून रविवारच्या तुलनेत सोमवारी तापमानात ३.१ अंशांनी घट होऊन ते ९.१ अंशांवर आले. हंगामातील ही नीचांकी पातळी असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकसाठी थंडी नवीन नाही. यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून तापमान कमी झाले होते. ऐन दिवाळीत तापमानाने १०.४ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. ७ डिसेंबरला तापमान १० अंश होते. नंतर अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, धुके या घडामोडीनंतर तापमान थेट नव्या नीचांकी पातळीवर आले आहे.

हे वाचले का?  नाशिक : नाल्यामुळे हर्षवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

गारठय़ामुळे उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागला. ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक आहे. उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव नाशिकच्या तापमानावर पडतो. मागील काही हंगामांतील नोंदी पाहिल्यावर डिसेंबर, जानेवारीत कडाक्याची थंडी पडते. याच काळात तापमान नीचांकी पातळी गाठते. त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे