नाशिकच्या ‘एचएएल’ कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : रशियन बनावटीच्या सुखोईसह मिग श्रेणीतील ९०० विमानांची बांधणी आणि दोन हजार विमानांची संपूर्ण देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स (एचएएल) कारखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील दोष दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईमुळे उजेडात आले आहेत. या विस्तीर्ण कारखान्यात प्रवेशद्वार, काही विशिष्ट संवेदनशील विभाग आणि अन्य काही मोजकी ठिकाणे वगळता उर्वरित अनेक विभाग आणि कक्षांमध्ये सीसी टीव्ही यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

एचएएल कारखान्यात अँड्रॉइड भ्रमणध्वनी नेण्यास कागदोपत्री प्रतिबंध असला आणि प्रवेशद्वारावर अंगझडती घेतली जात असली तरी अनेकांकडे भ्रमणध्वनी आढळतात, असे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  लढाऊ विमानांचा तांत्रिक तपशील, कारखान्यातील प्रतिबंधित क्षेत्र आणि गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला पुरविल्याच्या प्रकरणात ‘एचएएल’मधील साहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाठला दहशतवादविरोधी पथकाने अटक केल्यानंतर कारखान्याची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी यंत्रणा सतर्क झाली आहे. नियमांची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली.

दहशतवादविरोधी पथकाने संशयित ज्या विभागात कार्यरत होता, तेथे शनिवारी भेट देऊन त्याच्या मेजावरील कागदपत्रांची छाननी केली. या कारखान्यात तीन हजार कायमस्वरूपी, दीड हजार कंत्राटी असे एकूण साडेचार हजार कामगार आहेत. तर दीड हजार अधिकारी, तंत्रज्ञ आहेत. तीन सत्रांत कामकाज चालते. दीड कोटी चौरस मीटर इतकी जागा ‘एचएएल’च्या ताब्यात आहे. त्यातील पावणेदोन लाख चौरस मीटर क्षेत्रात लढाऊ विमानांची बांधणी, यंत्रणा, उपकरणे, देखभाल-दुरुस्ती आदींसाठी विभागनिहाय भव्य दालने उभारण्यात आली आहेत. लढाऊ विमानाच्या बांधणीपासून ते हवाई दलात कार्यरत झाल्यानंतर काही वर्षांनी त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम येथेच केले जाते.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

अतिशय महत्त्वाच्या अशा कारखान्यातील संवेदनशील माहिती, प्रतिबंधित क्षेत्रातील छायाचित्रे काढली जाऊ नयेत म्हणून आधुनिक तंत्राचे भ्रमणध्वनी नेण्यास पूर्वीपासून प्रतिबंध आहे. परंतु, या नियमांचे आजवर अपवादानेच पालन झाले आहे. सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी यंत्रणा प्रवेशद्वारावर अंगझडती घेते. अधूनमधून अकस्मात तपासणी मोहीम राबविण्यात येते. भ्रमणध्वनी सापडल्यास ताकीद दिली जाते. कधी कधी भ्रमणध्वनीही जप्त केले जातात, असे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी ‘एचएएल’मधील काही कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला. सरकारच्या ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’मुळे आसपास कोणी बाधित आहे का, याची माहिती मिळते. त्यामुळे या काळात आधुनिक भ्रमणध्वनी बाळगणे गरजेचे होते, असे समर्थन काहींनी केले. अनेक विभागांत सध्या काम नसल्याने मनोरंजनासाठी काही जण त्याचा वापर करीत असल्याचे सांगितले जाते.

हे वाचले का?  नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला

शिरसाठला अटक झाल्यानंतर चित्र काहीसे बदलले आहे. कामगार संघटनेने रातोरात भ्रमणध्वनीच्या नियमांची जाणीव कामगारांना करून दिली. जुना साधा भ्रमणध्वनी वापरण्यास हरकत नाही, परंतु छायाचित्रे काढण्याची आणि चित्रीकरणाची सुविधा असलेले भ्रमणध्वनी कोणीही बाळगू नये असे संदेश दिले गेले.

कारखान्यात लढाऊ विमानाशी निगडित छोटी-मोठी कामे करणारे अनेक विभाग आहेत. तेथील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्ही यंत्रणाही कार्यान्वित नाही. काही संवेदनशील विभागांपुरती ती मर्यादित आहे. सध्या नव्या सुखोईच्या बांधणीचे काम पूर्णत: थंडावले आहे. केवळ देखभाल-दुरुस्ती विभागात कामकाज सुरू आहे. अशा प्रसंगी वेगवेगळ्या विभागांत मोठय़ा संख्येने असणारे कामगार नेमके काय करतात, याकडे कसे लक्ष ठेवणार, हा प्रश्न आहे. कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांची पुरेशी माहितीही ठेवलेली नसते, याकडे काही कायमस्वरूपी कामगारांनी लक्ष वेधले.

मर्यादित यंत्रणा..

’अंगझडती घेऊनही अँड्रॉइड. भ्रमणध्वनींना मुक्त प्रवेश

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

’सीसीटीव्ही यंत्रणा काही संवेदनशील विभागापुरती मर्यादित

’अनेक कक्षांमध्ये

सीसीटीव्हीचा अभाव

’कंत्राटी कामगारांची तपशीलवार नोंद नाही. नियमांचे आजवर अपवादानेच पालन

’अकस्मात तपासणी मोहीम निरुपयोगी. भ्रमणध्वनी सापडल्यास फक्त ताकीद

एचएएल कारखान्यात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना आधुनिक भ्रमणध्वनी आत नेता येत नाही. संवेदनशील विभागांमध्ये सीसी टीव्ही यंत्रणाही आहे. सीसी टीव्ही यंत्रणा पुरेशी आहे. काही कक्षांत कमी कामगार किरकोळ स्वरूपाची कामे करतात. तेथे कॅमेऱ्यांची गरज नसते. प्रवेशद्वारांवर कॅमेरे बसवले आहेत.

 गोपाळ सुतार, जनसंपर्क अधिकारी, एचएएल