नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आठ धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी गंगापूर धरणातील आठ हजार क्युसेकवर पोहोचलेला विसर्ग सोमवारी सकाळी दोन हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे.

नाशिक – रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आठ धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी गंगापूर धरणातील आठ हजार क्युसेकवर पोहोचलेला विसर्ग सोमवारी सकाळी दोन हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी लक्षणीय कमी झाली. गोदावरीच्या पुराचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीखाली पाणी आले. या हंगामात नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून जवळपास १० हजार ४६७ म्हणजे सुमारे साडेदहा टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडले गेले आहे. अचानक वाढलेल्या पुरामुळे गिरणा नदीपात्रात १५ जण १७ तासांपासून अडकून पडले आहेत. रात्रीचा अंधार व गिरणा नदीच्या प्रवाहामुळे थांबलेले बचाव कार्य सोमवारी सकाळी नव्याने सुरू करण्यात आले. प्रशासनाने लष्करी हेलिकॉप्टरने त्यांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला. आठ धरणांमधून विसर्ग वाढल्याने गोदावरीसह अनेक नद्या, नाले दुथडी भरून वाहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने यंदा प्रथमच गोदावरीचे पाणी पात्राबाहेर गेले. गोदावरीच्या पाणी पातळीतील वाढीचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत सायंकाळपर्यंत पाणी आले होते. दिवसभर पावसाचा कायम राहलेला जोर रात्री कमी झाला. अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे रात्रीपासून गंगापूरसह बहुतांश धरणातील विसर्ग टप्प्याटप्याने कमी करण्यात आला. सोमवारी सकाळी गंगापूरमधून दोन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्यो गोदावरीच्या पातळीत मोठी घट झाली. दुतोंड्या मारुतीचे दर्शन होऊ लागले. या दिवशी सकाळी दारणा धरणातून १६१६८ क्युसेक, भावली १२१८, कडवा ६२९८, भाम ४३७०, वालदेवी १८३, पालखेड १५०२, नांदूरमध्यमेश्वर ५४२३३ क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. गोदावरीच्या होळकर पुलाखालील पातळीत सकाळी सुमारे दीड हजार क्युसेकने घट झाली असून विसर्ग कमी झाल्याने ती आणखी घटणार आहे.

२४ तासांत जायकवाडीला चार टीएमसीचा विसर्ग

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वर मार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते. मुसळधार पावसाने मागील २४ तासात जायकवाडीला चार हजार तीन दशलक्ष घनफूट म्हणजे चार टीएमसीचा विसर्ग झाला आहे. एक जून ते रविवारी सकाळपर्यंत जायकवाडीला सहा हजार ४६४ दशलक्ष घनफूट म्हणजे ६.४ टीएमसी पाण्याचा विसर्ग झालेला होता. सोमवारी सकाळी हंगामातील आतापर्यंतची आकडेवारी १० हजार ४६७ दशक्ष घनफूट म्हणजे साडेदहा टीएमसीवर पोहोचल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात म्हटले आहे. सोमवारी सकाळी नांदूरमध्यमेश्वरमधून ५४ हजार २३३ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मंगळवारीही जायकवाडीसाठी चांगला विसर्ग होण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत

गिरणा नदीपात्रात अडकलेल्यांना आता हेलिकॉप्टरची प्रतिक्षा

गिरणा नदी पात्रात हौस म्हणून मासेमारीसाठी गेलेले १५ जणांना रात्र टेकडीवर काढावी लागले. जवळपास १७ तासांपासून ते पुरात अडकून पडले असून त्यांना वाचविण्यासाठी नाशिकहून लष्कराचे हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आहे. धुळे येथून आलेल्या बचाव पथकाने सोमवारी सकाळपासून मदतकार्य सुरु केले. पाण्याचा मोठा प्रवाह आणी रात्रीची वेळ यामुळे बचाव कार्यास मर्यादा आल्या होत्या. चणकापूर आणि पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे या दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा नदीस पूर आला. धुळे व मालेगावमधील काही उत्साही लोक शहराजवळील संवदगावलगत गिरणा नदीपात्रातील मासेमारीसाठी गेले होते. नदीपात्रातील एका टेकडीवर उभे राहून ते मासेमारी करत असताना सायंकाळी अचानक पुराचे पाणी वाढले. त्यामुळे ही टेकडी पुराच्या पाण्याने वेढली गेल्याने ते तेथे अडकून पडले. संबंधितांना संपूर्ण रात्र तिथेच काढावी लागली.

हे वाचले का?  लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान