नाशिकमध्ये राज ठाकरे पुन्हा सक्रिय

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जिल्हा व शाखाध्यक्षांची खांदेपालट करीत १२२ शाखाध्यक्षांची नियुक्ती केली.

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जिल्हा व शाखाध्यक्षांची खांदेपालट करीत १२२ शाखाध्यक्षांची नियुक्ती केली. या माध्यमातून मोठे फेरबदल केल्याचा दावा करण्यात आला. महापालिकेतील मनसेचा सत्ताकाळ आणि सत्ता गमावल्यानंतरदेखील राज यांनी संघटना बांधणीकडे इतके लक्ष दिले नव्हते. नाशिकची जबाबदारी पुत्र अमित यांच्याकडे सोपविल्यानंतर ते संघटनेकडे अधिक गांभीर्याने पाहू लागले आहेत.

राज यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात हा बदल अधोरेखित झाला. शाखाध्यक्ष निवडीसाठी अमित ठाकरे यांनी मध्यंतरी मुलाखती घेतल्या होत्या. त्याआधारे राज यांनी यादी जाहीर केली. याच वेळी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांना शहराध्यक्ष तर शहराध्यक्ष अंकुश पवार यांना जिल्हाध्यक्षपद सोपविले गेले. या बदलात एकाला बढती देताना दुसऱ्याची पदावनती झाली. शहर समन्वयक या नव्या पदाची निर्मिती करून ते सचिन भोसले यांना देण्यात आले. अ‍ॅड्. रतनकुमार ईचम यांनाही जिल्हाध्यक्ष करण्यात आले. लवकरच पुन्हा नाशिक दौरा करून उपशाखाध्यक्ष व अन्य पदांची नियुक्ती करण्याचे राज यांनी म्हटले आहे. निवडणूक लक्षात घेऊन मनसेने तयारीला वेग दिला आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

राज्यातील इतर महानगरपालिकांच्या तुलनेत मनसेला नाशिकमधून जास्त अपेक्षा आहेत. राज्यातील या एकमेव महापालिकेत पक्षाची सत्ता होती. पक्षांतर्गत सुंदोपसुंदीत मागील निवडणुकीत ती गमावली. त्यानंतर राज यांची नाशिकची नाळ तुटली. अपवादात्मक स्थितीत त्यांचा दौरा व्हायचा.

शहरात नावीन्यपूर्ण प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवूनही नाशिककरांनी मनसेला नाकारल्याच्या भावनेत पक्षाने चार वर्षे घालवली. माजी आमदार वसंत गितेंसह अनेक पदाधिकारी, २८ नगरसेवक एकापाठोपाठ एक मनसेला सोडून गेले. ४० नगरसेवकांची संख्या अवघ्या पाचवर आली.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

याचा संघटनात्मक पातळीवर विचार झाल्याचे समोर आले नाही. मनपातील सत्ता गेल्यानंतर राज यांचे नाशिककडे दुर्लक्ष झाले होते. स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण मात्र कायम राहिले. डळमळीत अवस्थेत असलेल्या मनसेतील गटबाजी काँग्रेसला मागे टाकणारी ठरली.

या एकंदर परिस्थितीत दोन ते तीन महिन्यांपासून बदल होऊ लागले. राज यांचे नाशिक दौरे वाढले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे सोपविली जाणार आहे. याद्वारे त्यांचे नेतृत्व पुढे आणण्यावर मनसेचा भर आहे. अमित यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या निवडणुकीत मनसेला स्पर्धेत ठेवण्यासाठी राज यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी संघटना मजबूत करून पर्यायांची चाचपणी होत आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut : “मातोश्रीवर आलेले मुस्लिम लोक एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक, आम्ही..”; संंजय राऊत यांनी फोटो दाखवत केला ‘हा’ आरोप

गटबाजी रोखण्यासाठी खांदेपालट

खांदेपालटातून गटबाजी रोखण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केल्याचे लक्षात येते. नवनियुक्त शाखाध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले. पक्ष संघटनेसाठी जे चार वर्षांत घडायला हवे होते, ते अमित यांच्या आगमनामुळे अवघ्या काही आठवडय़ांत घडू लागल्याचे चित्र आहे.