नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

सदनिका मिळवून देणाऱ्या मध्यस्तालाही अटक करण्यात आली आहे.

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातून दोन महिला व २२ वर्षीय युवक अशा तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. उपजिविकेसाठी ते दोन महिन्यांपूर्वी शहरात आले. संशयित महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होत्या. संबंधितांना सदनिका मिळवून देणाऱ्या मध्यस्तालाही अटक करण्यात आली आहे.

बांगलादेशातील अस्थिरतेमुळे ते्थून भारतात घुसखोरी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असताना ही बाब समोर आल्यामुळे त्यास एकप्रकारे पुष्टी मिळत आहे. तीन बांगलादेशी नागरिक पाथर्डी गाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या पथकाच्या कारवाईत दोन महिलांसह २२ वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत संशयित दोन महिन्यांपूर्वी उपजिविकेसाठी शहरात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. दिंडोरी येथील जाधव नामक व्यक्तीने त्यांना मदत केली. पाथर्डी गाव परिसरात सदनिका उपलब्ध करीत करारनामा करून दिला. संशयित महिला याच भागातील ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होत्या.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

बांगलादेशी नागरिकांना सदनिका उपलब्ध करणाऱ्या जाधव नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. एटीएस पथकाने या संशयितांना इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. संशयित महिला ज्या ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होत्या. त्या संचालकाशी चौकशी केली जाणार असल्याचे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक शरमाळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास इंदिरानगर पोलिसांकडून केला जाणार आहे.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब