“नितीनजी, तुम्ही बोलता फार प्रेमात, पण…”; गडकरींच्या ‘त्या’ पत्रावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!

नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला रस्ते बांधणीच्या कामांसंदर्भात लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात रस्तेबांधमीची कामं करत असताना शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधींकडून अडथळा आणला जात असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली होती. नितीन गडकरी यांनी एक खरमरीत पत्रच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. असाच प्रकार सुरू राहिला, तर राज्यातील रस्त्यांची कामं मंजूर करताना विचार करावा लागेल, असा इशारा देखील नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात दिला होता. त्या पत्राच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. नागपूर मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी गडकरींना ग्वाही देखील दिली आहे.

“तुम्हीही कर्तव्यकठोर, आम्हीही कर्तव्यकठोर”

या पत्राविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमात, पण पत्र कठोर लिहिता. तुमचं आणि आमचं नातं थोडं वेगळं आहे. तुम्हीही कर्तव्यकठोर आहात, आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. आपल्याला कल्पना आहे की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे, ती आपणही घेतली आहे की जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही. त्यांचा विश्वासघात करायचा नाही. जनतेच्या कामात अडथळा येऊ द्यायचा नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. “मी तुमच्या पत्राचा हलका-फुलका उल्लेख जरी केला असला, तरी मी तुम्हाला ग्वाही देतो, की कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासकामांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही”, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

काय म्हणाले होते गडकरी पत्रात?

नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रामध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामांमध्ये अडथळे आणून कंत्राटदारांना त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. दोन पानी पत्रात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरी यांनी  केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे. कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल, असा गंभीर इशारा गडकरींनी पत्रातून दिला आहे.

हे वाचले का?  Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

गडकरींच्या या पत्रावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी टीका केली होती. “मला असं वाटतं की गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना आहे. गडकरींना अशा प्रकारचं पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. हीच गोष्ट ते फोनवरही बोलू शकले असते. पण मग हे पत्र माध्यमांसमोर का आलं? तुम्हाला खरोखरच अडथळा येत आहे म्हणून मार्ग काढायचा आहे की संधी मिळेल तिथे शिवसेनेला ठोकायचं आहे? मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की ज्यांनी सिंधुदुर्गामध्ये अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतला ते आमदार तुमच्याच पक्षाचे आहेत. शिवसेनेने असं काही केलेलं मला तरी आठवत नाही. त्यामुळे हे पत्र माध्यमांसमोर आणण्याऐवजी गडकरींनी मुख्यमंत्र्यांशी याबद्दल बोलणं केलं असतं तर त्यांच्याविषयीची आदराची भावना वाढली असती”, असं भास्कर जाधव म्हणाले होते.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!