साहित्य संमेलन खर्चात वाढ; बांधकाम व्यावसायिक, सहकारी बँकांना मदतीचे आवाहन
करोना काळात येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रारंभी गृहीत धरलेल्या साडेतीन कोटींच्या अंदाजपत्रकात विविध कारणांनी मोठी वाढ होत असल्याने धास्तावलेल्या संयोजकांनी वाढीव निधी संकलनासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्य शासन ५० लाख तर स्थानिक आमदारांच्या निधीतून दीड कोटी असा तब्बल दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. भव्य, दिव्य स्वरुपात संमेलनाचे आयोजन करता यावे म्हणून महापालिका, सहकारी बँका, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल आदी संघटनांना योगदान देण्याचे साकडे घालण्यात आले आहे.
शहरातील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात २६ ते २८ मार्च या कालावधीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची विविध पातळीवर तयारी प्रगतीपथावर आहे. करोना काळात उपाय योजनांमुळे संमेलन खर्चात वाढ झालेली आहे. त्यात संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने त्या अनुषंगाने निवास, भोजन, वाहतूक वा तत्सम व्यवस्थेची जबाबदारी वाढत आहे.
संमेलनात ‘कवी कट्टा’ उपक्रमांतर्गत कविता सादर होण्याचा विक्रम रचला जाईल. त्यासाठी आतापर्यंत दीड हजार कवींच्या कविता प्राप्त झाल्या आहेत. संमेलनातील अन्य उपक्रमात असाच प्रतिसाद मिळण्याचा संयोजकांचा अंदाज आहे. संमेलन स्थळावरील मुख्य सभा मंडपाची जागा बदलण्यात आली. आधी निश्चित झालेले मैदान आकाराने लहान होते. आता मुख्य सभामंडप उभारला जाणार आहे. १४ हजार इतकी त्याची क्षमता असेल. स्वागताध्यक्ष तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विविध संघटनांची बैठक बोलावत निधी अथवा अन्य मार्गाने संमेलनात योगदान देण्याचे आवाहन केले.
संमेलनासाठी महापालिकेकडे ५० लाखांची मागणी करण्यात आली. मात्र, आर्थिक स्थितीमुळे तितकी मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. संमेलनाच्या स्वागत समितीत आधी महापौर सतीश कुलकर्णी यांना स्थान नव्हते. तयारीत पालिकेचे लागणारे पाठबळ लक्षात घेऊन नंतर स्वागत समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
‘समित्यांमधील ६४४ सदस्यांकडून शुल्क घ्या’
मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ३९ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६४४ सदस्य आहेत. स्वागत समितीत सदस्यत्वासाठी पाच हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले तर राज्यातील प्रतिनिधींना नोंदणीसाठी तीन हजार रुपये शुल्क आहे. संमेलनातील विविध समित्यांमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांकडून काही शुल्क घेण्याबाबत विचार करावा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला. या माध्यमातून काही निधी संकलित होईल.