निम्म्या शहर बस निमाणी स्थानकातून सुटणार

महापालिकेच्या बस सेवेला एक महिना पूर्ण झाला असून प्रवासी संख्येने प्रतिदिन १५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

‘तपोवन’चा पर्याय बदलल्याने उत्पन्नात २५ हजारांची भर; प्रतिदिन ५०० किलोमीटर अंतराची बचत

नाशिक : शहरातील विविध भागातून येणाऱ्या सर्व शहर बस आता थेट तपोवन आगारात न नेता निम्म्या बस निमाणी स्थानकात थांबवून परतीच्या प्रवासाला पाठविल्या जात आहेत. या बदलामुळे एकाच दिवसात निमाणी ते तपोवन दरम्यानचे बसचे ५०० किलोमीटरचे अंतर कमी होऊन उत्पन्नात २५ हजाराची भर पडली. शिवाय विविध मार्गावर मार्गस्थ होण्याआधी निमाणी स्थानकात बसला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

महापालिकेच्या बस सेवेला एक महिना पूर्ण झाला असून प्रवासी संख्येने प्रतिदिन १५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी आजवरची सर्वाधिक १५ हजार ५३१ प्रवासी संख्या गाठली गेली. तसेच या दिवशी तीन लाख २० हजार १२५ रुपयांचे आजवरचे सर्वाधिक उत्पन्नही मिळाले. करोनाचे निर्बंध शिथील झाल्याचा लाभ बससेवेला होत आहे. बाजारपेठांची वेळ विस्तारल्याने नागरिकांचा भ्रमंतीचा कालावधी वाढला. सध्या ५२ बस शहरात धावत आहेत. सध्याच्या प्रतिदिन उत्पन्नात तपोवन आगाराचे एक लाख ६९ हजार ३७० तर, नाशिकरोड आगाराचे एक लाख ४७ हजार ६८० रुपये उत्पन्न आहे.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

उत्पन्न वाढत असले तरी बस सेवेला प्रतिदिन काही लाखाचा तोटा सहन करावा लागत असून तो भरून काढण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. शहरातील प्रमुख मार्गावर धावणाऱ्या बस तपोवन आगारातून सोडल्या जातात. परतीच्या प्रवासात त्या पुन्हा तपोवन आगारात जातात.

या प्रवासात त्यांना निमाणी स्थानकातून जावे लागते. निमाणी ते तपोवन दरम्यान बसला सरासरी केवळ एक प्रवासी मिळत होता. यातून उत्पन्नाऐवजी तोटय़ात भर पडत होती. हे लक्षात घेऊन तपोवन आगारात जाणाऱ्या निम्म्या बस निमाणी स्थानकात थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बस तपोवन आगारात पाठविल्या जात नाहीत. त्या निमाणी स्थानकातून परतीच्या मार्गावर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मनपाच्या निम्म्या बस तपोवन आगाराऐवजी निमाणी बस स्थानकातून वेगवेगळ्या मार्गावर मार्गस्थ होणार आहे.

हे वाचले का?  नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत

सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली. पहिल्याच दिवशी तपोवन आगारात जाणाऱ्या निम्म्या बस निमाणीत थांबवून तिथून सोडल्या गेल्या. त्यामुळे बसचे निमाणी ते तपोवन दरम्यानचे सुमारे ५०० किलोमीटरचे अंतर कमी झाले. यामुळे उत्पन्न २५ हजार रुपयांनी वाढल्याचे नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले. तपोवनमधून बस सोडताना प्रवासी मिळायचे नाहीत. निमाणी स्थानकात मात्र बस प्रवाशांनी भरून मार्गस्थ होत आहे. शिवाय प्रवाशांना कोणत्याही वेळी निमाणी स्थानकावर बस उपलब्ध असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘एसटी’च्या कार्यपध्दतीचा अवलंब

एसटी महामंडळाच्या बससेवेत निमाणी स्थानकातून बस सर्व मार्गावर सोडल्या जात असत. एसटी महामंडळाच्या जुन्या आडगाव नाक्यावरील डेपोचे अंतर फारसे नव्हते. तरीदेखील बस मार्गावर सोडण्याचे मुख्य ठिकाण निमाणी स्थानकच होते. मनपाच्या बस सेवेतील आगार एसटी महामंडळाच्या तुलनेत अधिक अंतरावर आहे. पुरेसे प्रवासी नसल्याने निमाणी ते तपोवन दरम्यानच्या फेऱ्या कमी करून एसटी महामंडळाच्या कार्यपध्दतीनुसार मनपाने उत्पन्न वाढविण्याचे नियोजन केले आहे.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम