नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

भारताच्या महिलांसमोर शनिवारी उपांत्य फेरीत मंगोलिया, तर पुरुषांसमोर इराणचे आव्हान असेल. 

भारताच्या महिला आणि पुरुष संघाने आशियाई नेशन्स चषक ऑनलाइन सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारली. भारताच्या महिलांसमोर शनिवारी उपांत्य फेरीत मंगोलिया, तर पुरुषांसमोर इराणचे आव्हान असेल.

भारताच्या महिला संघाने दोन डावांच्या या लढतीत किर्गिझिस्तानवर ४-० आणि नंतर ३.५-०.५ असा विजय मिळवला. आर. वैशालीने दमदार कामगिरी उपांत्यपूर्व फेरीतही कायम ठेवत दोन्ही लढतीत विजय मिळवला. तिने अलेक्झांड्रा समागानोवा नमवले. पद्मिनी राऊत आणि पी. व्ही. नंदिधा यांनीही दोन विजयांची नोंद केली. भक्ती कुलकर्णीला मात्र दुसऱ्या लढतीत बरोबरी स्वीकारावी लागल्याने भारताला दोन्ही लढती ४-० या निर्भेळ यशाने जिंकता आल्या नाहीत.

हे वाचले का?  Neeraj Chopra: ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा आज पुन्हा उतरणार मैदानात, डायमंड लीग स्पर्धा लाईव्ह कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार?

भारताच्या पुरुष संघाला मात्र मंगोलियाविरुद्धच्या लढतीत विजयासाठी चुरस द्यावी लागली. निहाल सरिनला उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या डावात पराभव स्वीकारावा लागला. मात्र दुसऱ्या डावात सरिनने सुमिया बिल्गुनविरुद्ध विजयाची नोंद केली. पहिल्या डावात भारताकडून एस. पी. सेतूरामन आणि शशीकिरण यांनी विजय मिळवले. कर्णधार सूर्यशेखर गांगुलीला मात्र पहिल्या डावात बिल्गुनविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली होती. दुसऱ्या डावात बी. अधिबानने विजयाचे योगदान दिले. पहिल्या डावात विजय मिळवलेल्या शशीकिरणला मात्र दुसऱ्या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले. गांगुलीला दुसऱ्या डावात हार स्वीकारावी लागली.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू