पंतप्रधान आज देहूमध्ये 

नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे.

पुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. समारंभात संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून १० मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी आणि भाविकांशी ते संवाद साधणार आहेत.

हे वाचले का?  Ashadhi Ekadashi : ‘बळीराजाचे दुःख दूर कर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुरायाला साकडं; अहिरे दाम्पत्याला महापूजेचा मान

पंतप्रधानांच्या पगडीवरील अभंगाच्या ओळींमध्ये बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी पगडी घातली जाणार आहे, त्यावरील अभंगाच्या ओळीमध्ये बदल करण्यात आला आहे. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या पूर्वीच्या अभंगाच्या ओळी काढून ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ’ या ओळी आता पगडीवर कोरण्यात आल्या आहेत.  देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे मंगळवारी (१४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याप्रसंगी ‘संत तुकाराम पगडी’ देऊन पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे. या पगडीची रचना करणारे ’मुरुडकर झेंडेवाले‘चे गिरीश मुरुडकर यांनी त्याला दुजोरा दिला आहे.  मुरुडकर म्हणाले, देहू संस्थानच्या विश्वस्तांनी या पगडीची पाहणी केली. त्यानंतर पगडीवरील तुकोबांच्या ओळी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे वाचले का?  पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता

पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री ठाकरे एका व्यासपीठावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत असून राजभवनमधील कार्यक्रमात मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर  उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी हे मंगळवारी मुंबईत दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या  दालनाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले