पंतप्रधान मोदी करणार अमेरिकेचा दौरा; बायडेन यांच्यासोबत होणार चीन-अफगाणिस्तानवर चर्चा

मोदींनी यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये आपला शेवटचा अमेरिका दौरा केला होता. जेव्हा अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाला संबोधित केले होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा असेल. द इंडियन एक्सप्रेसने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्कला भेट देण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान हा दौरा होण्याची शक्यता आहे. मोदींनी यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये आपला शेवटचा अमेरिका दौरा केला होता. जेव्हा अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाला संबोधित केले होतं.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

पहिली वैयक्तिक भेट

पंतप्रधान मोदी यांची आणि जो बायडन यांची पहिली वैयक्तिक भेट ठरणार आहे. यापूर्वी ३ प्रसंगी या दोन्ही नेत्यांची आभासी भेट झाली आहे. मार्चमध्ये क्वाड शिखर, एप्रिलमध्ये हवामान बदल शिखर आणि यंदा जून महिन्यामध्ये जी -७ शिखर परिषदेला हे दोन्ही नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेटले आहेत. खरंतर मोदी जी -७ शिखर परिषदेसाठी यूकेला जाणार होते. तिथे ते बायडनला भेटू शकले असते. परंतु, संपूर्ण देशात असलेल्या करोना लाटेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करावा लागला होता.

अफगाणिस्तान आणि चीनबाबत चर्चा

अफगाणिस्तानमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आणि चिंताजनक रूप धारण करत असताना  मोदी आणि बायडेन यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरते. बायडेन यांच्यासह मोदी यावेळी अमेरिकन प्रशासनाच्या उच्चपदस्थांशी देखील महत्त्वपूर्ण बैठका घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी चीनवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. चीन आणि इंडो -पॅसिफिकवरील महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करण्यासाठीच्या प्रयत्नांबाबत देखील बातचीत होऊ शकते.

हे वाचले का?  छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश

विशेष म्हणजे वॉशिंग्टन डीसीमध्ये वैयक्तिकरित्या क्वाड लीडर्स शिखर परिषद आयोजित केली जात आहे. त्याच वेळी पंतप्रधान मोदींचा हा दौरा देखील आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, मोदींच्या या अमेरिका दौऱ्यापूर्वी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बायडेन प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ज्यात परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन आणि उपसचिव वेंडी शर्मन यांचा समावेश होता. यावेळी, धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर