पंतप्रधान मोदी यांनी स्वप्ने अनेक दाखविली, पण वास्तव वेगळे; खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्ने अनेक दाखविली, पण प्रत्यक्ष जगतानाचे वास्तव मात्र वेगळेच आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली.

सुप्रिया सुळे (संग्रहीत छायाचित्र)

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्ने अनेक दाखविली, पण प्रत्यक्ष जगतानाचे वास्तव मात्र वेगळेच आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. खासदार सुळे येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार डॉ.फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्रानी, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के आदी या वेळी उपस्थित होते.
केंद्रातील मोदी शासनाच्या काळात प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य कमी झाले असून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. अनेक स्वप्ने दाखविली गेली पण प्रत्यक्षातले वास्तव वेगळे आहे. महागाईच्या रूपाने दररोज नवी भेट मिळत आहे. एकीकडे गव्हाची निर्यात करण्याचा निर्णय घेतला गेला, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे वाटले पण प्रत्यक्षात अवघ्या दोन दिवसात हा निर्णय फिरवला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असेही सुळे यांनी सांगितले.
सुळे म्हणाल्या,की महाविकास आघाडी सरकारची कामगिरी उत्तम चालली आहे. हे सरकार अस्तित्वात येऊ शकते याची आधी कोणी कल्पनाही केली नव्हती. विधानसभा निवडणुकीआधी दररोजच राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत होती. आजही भारतीय जनता पक्षाच्या १०५ आमदारांपैकी ४६ आमदार हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस-राष्ट्रवादीमधून आलेले आहेत. असे असतानाही महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि या सरकारने उत्तम कामगिरी चालवली आहे. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे नोकरभरती झाली नाही. मात्र,आता सर्व क्षेत्रातील नोकरभरती सुरू होईल असे त्या म्हणाल्या. भोंगा प्रकरणावर बोलताना त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा हेतू कदाचित चांगला असेल पण करायला गेलो एक आणि झाले भलतेच असा प्रकार याबाबत घडला आहे, असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र शासन, परभणी जिल्हा प्रशासन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र-परभणी, आणि स्वरूप चॅरिटेबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील कर्णबधिर व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वितरण कार्यक्रम श्रीमती सुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय येथे दि. २७ मे ते २ जून या काळात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत हे शिबिर होणार आहे.
श्रवणयंत्रांमुळे कर्णबधिर व्यक्तींना पुन्हा ऐकता येऊ शकते. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कर्णबधिरांसाठी हा कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येतो, असे या वेळी श्रीमती सुळे म्हणाल्या. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे,जिल्हाधिकारी आंचल गोयल, राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवाब मलिक यांचेच म्हणणे खरे ठरले !
कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून क्लीनचीट दिल्याचा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सातत्याने या प्रकाराचा फर्जीवाडाह्ण असा उल्लेख करत या फर्जीवाडय़ाविरोधात अगदी खुलेआमपणे टीका केली. अखेर मलिक यांचेच म्हणणे खरे ठरल्याचे श्रीमती सुळे यांनी या वेळी नमूद केले.