पंतप्रधानांकडे तक्रार करूनही कोंडी कायम ; नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनधारक अनेक तास कोंडीत; ‘नाशिक फस्र्ट’ न्यायालयात जाणार

चारपदरी महामार्गामुळे वेगवान झालेल्या नाशिक-मुंबई प्रवासाला ठाणे, भिवंडी परिसरातील खड्डे आणि प्रचंड वाहतूक कोंडीने करकचून ब्रेक लावला आहे

नाशिक : ठाणे ते मानकोली दरम्यानच्या वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रवास अतिशय जिकिरीचा ठरत असून कोंडीत वाहने दोन-तीन तास अडकून पडत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात अ‍ॅडव्हान्टेज नाशिक फाऊंडेशन अर्थात ‘नाशिक फस्र्ट’ने पंतप्रधान कार्यालयाकडे दाद मागितली होती. मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने रखडपट्टी कायम आहे.

ठाणे ते अंजुरफाटा मार्गावरील राजकीय नेत्यांची गोदामे, अवघड वाहनांची वाढती संख्या, भिवंडी वळण रस्त्यावरील बंद टोल नाक्याचा अडथळा आदींचे संदर्भ देत कुठे काय अडचणी येतात याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने उत्तर दिले. भिवंडी टोल नाका हा वडपे-ठाणे मार्गाच्या विस्तारीकरणात हटविला जाईल. माजीवडा-वडपे हा चार मार्गिकेचा टप्पा आठ मार्गिकेचा करण्याचे काम सुमारे १० वर्षांपासून रेंगाळले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही महामार्गावरील स्थितीत सुधारणा न झाल्यामुळे नाशिक फस्र्टने वाहतूक कोंडी, खड्डे यावरून उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे.   चारपदरी महामार्गामुळे वेगवान झालेल्या नाशिक-मुंबई प्रवासाला ठाणे, भिवंडी परिसरातील खड्डे आणि प्रचंड वाहतूक कोंडीने करकचून ब्रेक लावला आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. नाशिकहून जाणाऱ्या आणि मुंबईहून नाशिकला येणाऱ्यांना ठाणे, भिवंडीचा टप्पा पार करणे अग्निदिव्य ठरले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गावरून नाशिकला आले होते. महामार्गाची दुरवस्था पाहून त्यांनी तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले होते. तथापि, परिस्थितीत आजही कुठलाही फरक पडलेला नसल्याचे या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणारे वाहनधारक सांगतात. या मार्गावरील बिकट परिस्थितीबाबत अ‍ॅडव्हान्टेज नाशिक फाऊंडेशनने पंतप्रधान कार्यालयाकडे पोर्टलवर तक्रार करून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने या मार्गावरील गोंदे ते वडपे आठ पदरी काँक्रीटचा रस्ता करण्याचे जाहीर केले. त्यासाठी पाच हजार कोटींच्या निधीची घोषणा झाली. अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम तातडीने पूर्ण करण्याची निकड मांडली गेली.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

महामार्गावर भिवंडी वळण रस्त्यावर बंद झालेला टोल नाका आहे. तो हटवून वाहतुकीतील अडथळे दूर करता येतील. ठाणे-अंजुर फाटादरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी असते. कारण दोन्ही बाजूला राजकीय नेत्यांची गोदामे आहेत. या परिसरात अवजड वाहनांची सातत्याने ये-जा होते. १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अडीच तास लागतात. नाशिक-मुंबई दरम्यानच्या १५० किलोमीटरच्या प्रवासाला साधारणपणे चार तास लागतात. वाहतूक कोंडीने हा प्रवास सहा ते सात तासांवर गेल्याचे चित्र आहे. पूर्वद्रुतगती मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून वळवली आहे. त्याचाही परिणाम नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतुकीवर होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीवर महामार्ग विकास प्राधिकरणने मोघम उत्तर देत जबाबदारी टाळल्याची भावना व्यक्त होत आहे. यापूर्वी हा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला गेला. मात्र, त्यांच्याकडून पत्राला साधे उत्तर दिले गेले नाही. वाहतूक सुरळीत राखण्यासाठी महामार्ग वा स्थानिक पोलीस दिसत नसल्याचे वाहनधारक सांगतात. नाशिक-मुंबई चौपदरीकरणासाठी नाशिक फस्र्ट संस्थेने बराच पाठपुरावा केला होता. शहरातील व महामार्गावरील वाहतूक सुरक्षित राखण्यासाठी संस्था वाहनचालकांना प्रशिक्षण देण्याचे काम अव्याहतपणे करीत आहे. नाशिक-मुंबई मार्गावरील असह्य वाहतूक कोंडीसाठी संस्था न्यायालयात जाण्याच्या निर्णयाप्रत आली आहे.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

नाशिक-मुंबई दरम्यानच्या भिवंडी, ठाणे परिसरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना दोन-तीन तास अडकून पडावे लागते. वेळेचा मोठा अपव्यय होतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे दाद मागण्यात आली होती. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने उत्तर दिले. महामार्गावरील स्थितीत कुठलेही बदल झालेले नाही. गोंदे ते वडपे टप्प्याचे आठ पदरीकरण दशकभरापासून रखडलेले आहे. मार्गावरील बंद टोल नाका वाहतुकीत अडथळा ठरतो. या भागातील कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.

हे वाचले का?  मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

– अभय कुलकर्णी (प्रमुखअ‍ॅडव्हान्टेज नाशिक फाऊंडेशन)

महामार्ग विकास प्राधिकरणचे दावे

रखडलेल्या गोंदे ते वडपे विस्तारीकरणाचा विषय आपल्या विभागाशी संबंधित नाही. भिवंडी वळण रस्त्यावरील टोल नाका विस्तारीकरणावेळी हटविला जाऊ शकतो. आम्ही दुभाजक हटवून वाहतूक सुरळीत राखण्याचा प्रयत्न केला. ठाणे ते वडपे या चार पदरी मार्गावर सध्या एक लाख वाहने असतात. त्यामुळे हा टप्पा आठ मार्गिकेचा आणि दोन्ही बाजूला दुपदरी सेवा रस्त्याची व्यवस्था केली जात असल्याचे म्हटले आहे. पावसाळय़ात समांतर रस्ते खराब झाल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा भार वाढतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळे उपाय योजताना पोलीस दलाच्या सूचनाही विचारात घेतल्या जात असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने केला आहे.