पद्मश्री स्वीकारतानाचा सिंधुताईंचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहताना PM मोदी म्हणाले, “त्यांच्या प्रयत्नांमुळेच…”

‘अनाथांची माय’ अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं आज (४ जानेवारी २०२१ रोजी) पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं सांगत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केलीय. मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सिंधुताईंचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात.

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, “सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,” अशा शब्दांमध्ये सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केलीय.