पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी ; करोना नियमावली पालनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

करोना नियमांचे कोठेही पालन होत नसताना प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.

नाशिक : करोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत असताना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे मात्र खुली होती. आठवडय़ाचे शेवटचे दिवस या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असे. करोना नियमांचे कोठेही पालन होत नसताना प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.

या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती दिली. जिल्हा परिसरात करोनाचा आलेख उंचावत असताना सद्य:स्थितीत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार लाख ३६ हजार ०७९च्या घरात पोहोचली आहे. तर करोनामुळे चार हजार २५३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. ही साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन संचारबंदी, जमावबंदी यासह वेगवेगळय़ा माध्यमांतून गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

मात्र एरवी घरात असलेले नागरिक सुट्टीच्या दिवशी किंवा अन्य वेळी जिल्हा परिसरातील पर्यटनस्थळांवर गर्दी करतात. त्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर न करता निसर्गाच्या सान्निध्यात सेल्फी काढण्याचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू राहातो. या ठिकाणी बऱ्याचदा सामाजिक अंतर नियमाचा विसर पडत असून पर्यटक परिसरात अस्वच्छता करतात. या माध्यमातून करोनाचा संसर्ग वेगाने पसरू शकतो.

 जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे तसेच धरण परिसरात तर नाशिकसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हजेरी लावतात. राज्यात अन्य ठिकाणी पर्यटनस्थळांवर बंदी असताना नाशिक जिल्ह्यातही पुढील आदेश येईपर्यंत सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी केल्याचा आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला.

आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. शासकीय आदेशानुसार पर्यटनस्थळे बंद असून या सर्व ठिकाणी जमावबंदी, संचारबंदी आदेश लागु करण्यात आला आहे. याचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमनुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

धरण परिसरात गर्दी 

गंगापूर धरणासह वैतरणा, भावली धरण परिसरात शनिवार, रविवार मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांकडून गर्दी होत असे. या ठिकाणी जवळच शेतघर, रिसोर्ट असल्याने अनेक जण कुटुंबासह धरण परिसरात जलसफारीचा आनंद लुटण्यासाठी येत होते. मात्र त्या वेळी होणाऱ्या गर्दीला करोनाच्या नियम पालनाचा विसर पडायचा. प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे का, असे हे चित्र पाहून वाटत असे. विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम यांना विशिष्ट संख्येने उपस्थितीची मर्यादा दिली असताना पर्यटनस्थळे खुली का, पर्यटकांना नियम नाहीत का, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. किल्ल्यांवरही गडकोट स्वच्छतेच्या नावाखाली काही हौशी पर्यटकांकडून हैदोस घातला जात होता.

हे वाचले का?  नाशिक महापालिकेची सिटीलिंक बससेवा पावणेदोन वर्षात १० वेळा ठप्प; पगार वाढीसाठी चालक संपावर, हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

बंद करण्यात आलेली ठिकाणे

जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत, अंजनेरी, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, साल्हेर किल्ला, पहिने, भास्कर गड, रामशेज किल्ला, भावली धरण, वैतरणा धरण, गंगापूर धरणासह जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे यावर पर्यटनास बंदी आहे.