पहाटेच्या शपथविधीचं रहस्य काय? प्रश्न विचारताच शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले…

आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना पहाटेच्या शपथविधीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी एका ओळीत उत्तर दिलं आहे

महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. याचं कारणही तसंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील म्हणाले की पहाटेचा शपथविधी घडविण्यामागे शरद पवारांची खेळी असू शकते. जयंत पाटील यांनी हे वक्तव्य करताच विविध तर्कांना पुन्हा एकदा उधाण आलं. तर विविध प्रतिक्रियाही समोर आल्या. याबाबत स्वतः शरद पवार काही बोलणार का? या चर्चा होत्या. आज त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अवघ्या एका ओळीत विषय संपवला.

शरद पवार पहाटेच्या शपथविधीबाबत काय प्रश्न विचारल्यानंतर काय म्हणाले?

पहाटेचा शपथविधी हा विषय गेले तीन दिवस गाजतो आहे. या शपथविधीचं नेमकं रहस्य काय? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “अहो दोन वर्षे झाली त्या गोष्टीला. आता पुन्हा तो विषय कशाला काढता? त्यावर आता चर्चा करून काय होणार आहे?” शरद पवार यांनी प्रतिप्रश्न करत विषयावर पडदा टाकला आहे. मात्र पहाटेचा शपथविधी ही त्यांचीच खेळी होती का? यावर उत्तर दिलेलं नाही.

हे वाचले का?  Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

जयंत पाटील यांनी काय म्हटलं ?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा जो पहाटेचा शपथविधी झाला तो शपथविधी म्हणजे शरद पवारांची खेळी असू शकते. मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नवह्ता. त्या अनुषंगाने शरद पवारांनी केलेली ही खेळी असू शकते. त्यामुळे त्या गोष्टीला जास्त काही महत्त्व आहे असं वाटत नाही. त्यावेळी अजित पवार यांनी काय वक्तव्यं केली होती त्यांना आज महत्त्व नाही. कारण त्यानंतर अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. शिवसेनेचे आमदार फुटले म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली हे नाकारता येणार नाही.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

पहाटेचा शपथविधी कसा झाला? आधी काय घडलं होतं?

२३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली होती. या शपथविधीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवली होती. हा शपथविधी होण्याच्या एक दिवस आधी रात्री काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीत सरकार कसं आणायचं? याची खलबतं सुरू होती. त्या बैठकीत शरद पवार, संजय राऊत, अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील असे दिग्गज उपस्थित होते. या बैठकीतून अजितदादा तडकाफडकी निघून गेले होते. त्यानंतर हा शपथविधी झाला. मात्र शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या सगळ्या आमदारांना पुढच्या २४ तासांमध्ये माघारी आणण्यात यश मिळवलं. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव