पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग बंद

जिल्ह्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोमवारपासून जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा आणि इयत्ता ११ वीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यत करोनाचा वाढता प्रादुर्भाव; दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहणार

नाशिक : जिल्ह्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोमवारपासून जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा आणि इयत्ता ११ वीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करोनाची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मागील १० दिवसात जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या चौपटीने वाढली आहे. मनमाडमध्ये दोन शिक्षक करोनाबाधित आढळले. तर नाशिक शहरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण शालेय विद्यार्थी असल्याचे उघड झाले. मुंबई आणि अन्य काही शहरांमध्ये अतिशय झपाटय़ाने रुग्ण संख्या वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाय योजनांवर बैठकीत चर्चा झाली. त्यात शाळांबाबत विचार विनिमय करून शालेय विद्यार्थ्यांना करोनाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत शहर व जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. दिवाळीनंतर ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरु झाले होते.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

१३ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी तर शहरात इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. नंतर शहरी भागातील इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले. करोनाच्या नव्या संकटाने विद्यार्थ्यांचा शाळा सुरू होण्याचा आनंद औट घटकेचा ठरला. आता जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीचे वर्ग देखील ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग केवळ नियमांचे पालन करून सुरू ठेवता येणार आहेत. दरम्यान, करोनाची स्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत मंदिर अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

..तर धान्य पुरवठा बंद

ओमायक्रॉनचे सावट घोंघावत असूनही लसीकरणाबाबत अनास्था आहे. पहिली मात्रा घेणारे सुमारे आठ लाख व्यक्ती दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असूनही त्यांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसांत लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण न केल्यास शिधापत्रिकेवरील धान्याचा पुरवठा थांबविला जाणार आहे. तसा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

मालेगावचा अभ्यास करणार

जिल्ह्यात शहरी भागात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असली तरी मालेगाव शहरात प्रसाराचा वेग अतिशय कमी आहे. त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला प्रश्न पडला आहे. याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला संशोधन करण्यास सांगण्यात आल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांसह खा. हेमंत गोडसे करोनाबाधित नाशिक जिल्ह्यातील दोनही खासदारांना करोनाने घेरले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना करोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्यांनी करोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डॉ. पवार दोन ते तीन दिवसांपासून शहर तसेच जिल्ह्यातील वेगवेगळय़ा कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हस्ते जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण मोहिमेचे उदघाटन करण्यात आले होते.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर